
देशातील 22 राज्यांत मान्सूनधारा कोसळत असून अनेक ठिकाणी पावसाने रौद्र रूप धारण केले आहे. एकीकडे पावसाने मुंबईला झोडपून काढले असताना पावसामुळे राजधानी दिल्लीचा वेगही मंदावला आहे. हिमाचल प्रदेशच्या कुलू जिह्यात रात्रभर कोसळणाऱया पावसामुळे मणिकर्ण घाटीत पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात अनेकजण वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे राजस्थानातही 142 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
मुंबईसह दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, केरळ, उत्तर प्रदेशात पावसाची संततधार सुरू आहे. दिल्लीमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कुलूतील मणिकर्ण घाटीतील चोज नाल्याला आलेल्या पुरामध्ये अनेक हॉटेल आणि घरे वाहून गेली आहेत. या दुर्घटनेत अनेत जण बेपत्ता असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शिमला जिह्यातील रामपूरमध्ये रस्ता खचला असून त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे.
राजस्थानमध्ये मान्सूनचे आगमन उशिरा झाले असले तरी पावसाचा जोर कायम आहे. पहिल्या चार दिवसांतच जयपूरला पावसाने झोडपून काढले आहे. येथे आतापर्यंत 142 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 7 आणि 8 जुलैला जिह्यातील कोटा, बुंदी, चित्तोडगड, भीलवाडा, झालावाडा आणि राजसमंद भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशच्या पश्चिमी भागात पाऊस
पूर्वांचलकडून येणाऱया मान्सूनने आता उत्तर प्रदेशात प्रवेश केला आहे. हवामान विभागाने उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागातील 12 जिह्यांत पावसाची शक्यता वर्तविली आहे.
मध्य प्रदेशातही मान्सून सक्रिय
मध्य प्रदेशातील सर्व जिह्यांत मान्सून सक्रिय झाला आहे. भोपाळमध्ये आतापर्यंत 4 इंच पावसाची नोंद झाली आहे. ओडिशात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे मध्य प्रदेशात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील चार दिवस इंदौरसह सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.



























































