भंडारदरा पाणलोटात जोरदार पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा पाणलोटात चौथ्या दिवशी जोरदार पाऊस झाल्याने धरणात गेल्या 24 तासांत नव्याने 367 दलघफू पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे भंडारदरा धरणातील पाणीसाठा 3608 दलघफू (31.54 टक्के) झाला आहे. शुक्रवारी सकाळी संपलेल्या 24 तासांत घाटघरमध्ये 191 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

भंडारदरा पाणलोटात पावसाचे धुमशान सुरू आहे. घाटघर आणि रतनवाठीत अनुक्रमे 191 आणि 164 मि.मी. पाऊस नोंदविला गेला. पावसाने जोर पकडल्याने डोंगर-दऱयांमधून वाहणारे धबधबे रौद्ररूप धारण करू लागले आहेत. ओढे-नालेही भरभरून वाहत असून, धरणाचे खाली गेलेले पोट आता फुगू लागले आहे. आतापर्यंत धरणात नव्याने 1024 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले आहे. वाकी धरणातही आवक होत असल्याने पाणीसाठा हळूहळू वाढत आहे. 112 दलघफू क्षमतेच्या या धरणातील पाणीसाठा 62.27 दलघफू (54.70) टक्के झाला आहे. निळवंडे धरणातही नव्याने पाणी येत आहे.

मुळात संथ गतीने आवक

हरिश्चंद्रगड, पाचनई व अन्य भागांत अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने कोतूळजवळ मुळा नदीतील विसर्ग 2829 क्युसेकवर गेला असून, धरणात संथ गतीने आवक होत आहे. मुळा नदीवरील 600 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या पिंपळगाव खांड धरण अपेक्षेप्रमाणे बुधवारी ओव्हरफ्लो झाले. त्यापूर्वी आंबितही तुडुंब आहे. मुळा पाणलोटात पाऊस सुरू असल्याने शेतकऱयांना दिलासा मिळाला आहे.