
आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. रिकामे स्टेडियम असूनही सुरू असलेली तिकिटांची बोंबाबोंब. दुसरीकडे हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याला दिलेली अवाजवी हाइप आणि आता या सामन्याच्या पार्श्वभूमीवर अतिरेक्यांनी दिलेली नरेंद्र मोदी स्टेडियम उडवण्याची धमकी. या साऱया घटनांमुळे स्टेडियमला छावणीचे स्वरुप प्राप्त होणार असून परिंदा भी पर नहीं मार सकता असा कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे. त्यामुळे हा ब्लॉकबस्टर सामना पाहायला येणाऱया प्रेक्षकांना सुरक्षा व्यवस्थेचाही मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप सुरू होण्याआधीच साऱयांना केवळ हिंदुस्थान-पाकिस्तान लढतीचेच वेध लागले होते. हा सामना आधीपासूनच संवेदनशील मानला जात होता. अतिरेक्यांनी मोदी स्टेडियम उडविण्याची धमकी दिल्यापासून तो अतिसंवेदनशील झाला आहे. या सामन्याला जगभरातून सवा लाखापेक्षा अधिक क्रिकेटप्रेमी येण्याची शक्यता असल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर खूप मोठा ताण पडणार आहे. त्यामुळे मैदानाच्या परिसरात सीआरपीएफसह राष्ट्रीय सुरक्षा रक्षकही (एनएसजी) तैनात करण्यात आलेले आहेत.
अतिरेक्यांनी ई-मेलद्वारे हल्ल्याची धमकी दिल्याने अहमदाबाद पोलिसांनी हिंदुस्थान-पाकिस्तान लढतीपूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी) यंत्रणेची मदत घेण्याचा निर्णय घेतलाय. लाखापेक्षा अधिक लोकांची काळजी घेण्यासाठी तमाम पोलीस पर्ह्सशिवाय एनएसजीची तीन पथके स्टेडियमची सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सज्ज झाली आहेत. हिंदुस्थानात उभय संघांमध्ये तब्बल 11 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर क्रिकेटचा सामना होणार आहे. त्यामुळे साहजिकच या लढतीसाठीची उत्सुकता टिपेला पोहोचली आहे. कुठली रिस्क नको म्हणून अहमदाबाद पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत कुठलीच कमतरता ठेवलेली नाहीये. तीन दिवसांपूर्वी आलेल्या एका ई-मेलद्वारे अतिरेक्यांनी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याला सोडून देण्याची मागणी केली आहे. अन्यथा मोदी स्टेडियम उडवून दिले जाईल, अशी धमकी दिलीय.
चाहत्यांनी घाबरू नये!
सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे दक्ष आहे. चाहत्यांना घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. त्यांनी मनमुरादपणे सामन्याचा आनंद लुटावा. अहमदाबाद पोलीस क्रिकेट चाहत्यांच्या सुरक्षेसाठी सज्ज असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त चिराग कोरडिया यांनी दिली. अहमदाबाद पोलिसांनी बी प्लॅनही तयार आहे. शाहपूर, दरियापूर व जमालपूर या संवेदनशील भागात सर्वांची कसून तपासणीही केली जाणार आहे.
1लाख 32हजार चाहत्यांसाठी 7 हजार पोलीस सज्ज
हिंदुस्थान-पाकिस्तान दरम्यानच्या क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक घेत पोलीस बंदोबस्ताच्या तयारीची माहिती घेतली. या हायव्होल्टेज सामन्याच्यासाठी 7 हजार पोलीस तैनात केले जातील, अशी माहिती अहमदाबादचे कमिशनर आयपीएस जी. एस. मलिक यांनी दिली. याचबरोबर 4 हजार होमगार्डची फौजही दिमतीला असेल. याचबरोबर एनएसजीची तीन पथके आणि एण्डी ड्रोनचे पथकही असेल. बॉम्ब निकामी पथकासह एनडीआरएफ व एसडीआरएफची पथकेही सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात असतील, अशी माहितीही त्यांनी दिली.


























































