
सामना प्रतिनिधी, नगर
नगर शहरामध्ये हेल्मेट सक्ती केल्यानंतर आज सकाळपासूनच अनेक ठिकाणी पोलिसांनी धडक कारवाई हाती घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नगर शहरात हेल्मेट सक्तीचा विषय पुन्हा सुरू झाला आहे.
शहरातील गॅस चौक पत्रकार चौक आदी भागांमध्ये पोलिसांचे विशेष पथक सकाळपासूनच तैनात आहे. ज्यांनी हेल्मेट परिधान केले नाही, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात असून दंडवसुलीही सुरू आहे. पोलीस प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे चांगलेच हाल होताना दिसत आहेत.
अनेकांनी हेल्मेट खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी वाढताना दिसत आहे. काही ठिकाणी हेल्मेट उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची मोठी पंचाईत झाली आहे. या प्रकारावर नगरकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वास्तविक पाहता शहरांमध्ये हेल्मेट सक्ती करण्यापेक्षा महामार्गावरून हेल्मेट सक्ती करावी, अशी मागणी आता समोर येऊ लागली आहे.





























































