अधिष्ठात्यांना शौचालय धुवायला लावणाऱ्या खासदाराविरोधात गुन्हा दाखल

नांदेडमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात 48 तासांत 31 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.ही घटना ताजी असतानाच छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात गेल्या 24 तासात 14 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या दोन्ही घटनांनी महाराष्ट्र राज्य हादरले होते. या दोन घटनांमुळे मिंधे सरकारच्या राजवटीत आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे चित्र दिसायला लागले आहे. याही परिस्थितीत राजकीय पोळी भाजण्यासाठी मिंधे गटातील  गद्दार खासदार हेमंत पाटील यांनी चमकोगिरी करत नांदेड जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. श्याम वाकोडे यांना हातात झाडू घ्यायला लावत शौचालय घासायला लावले. ते झाडू मारत असताना पाटील हे हातात पाण्याचा पाईप घेऊन उभे होते. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. सदर प्रकारानंतर अधिष्ठाता वाकोडे यांनी खासदार पाटील यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मार्ड या संघटनेनेदेखील पाटील यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार पाटील यांनी अधिष्ठात्यांशी केलेले वर्तन हे लोकप्रतिनिधीला शोभा देणारे नव्हते. यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी मार्डने केली आहे. माफी मागितली नाही तर संपूर्ण राज्यातील डॉक्टर आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे.