भविष्यात होणारे युद्ध सर्वाधिक विनाशकारी – लष्करप्रमुख बिपीन रावत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

प्रगत तंत्रज्ञान प्रचंड वेगाने पुढे जात असून भविष्यात होणारी युद्धं सर्वाधिक विनाशकारी असतील. या युद्धांमध्ये मोठय़ा प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी होईल, अशी भीती लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या युद्धांना त्यांनी हायब्रीड युद्ध असे म्हटले आहे.

कारगील युद्धाला 20 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित एका कार्यक्रमात रावत बोलत होते. भविष्यात होणारी युद्धं अत्यंत विनाशकारी असतील. अशाप्रकारच्या मल्टी स्पेक्ट्रम युद्धांसाठी हिंदुस्थानी सैन्याने तयार राहायला हवे. वाढत्या तंत्रज्ञानामुळे युद्धनीतीही बदलत चालली आहे. सायबर जगताचा वापरही युद्धात करण्यात येऊ शकतो. सायबर हल्लेही मोठय़ा प्रमाणावर घडत असून अशा प्रकारची युद्धनीती कुणी हिंदुस्थानविरुद्ध वापरली तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यात येईल, असेही रावत यांनी सांगितले. कारगील युद्धात हिंदुस्थानी सैन्याने मिळवलेला विजय देश आणि सैन्यासाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याचेही ते म्हणाले. तब्बल 60 दिवस हे युद्ध चालले. 26 जुलै रोजी हे युद्ध संपले. पाकिस्तानी सैन्याने कारगीलमध्ये घुसखोरी केली होती. त्यांना हिंदुस्थानी सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले होते.

रावत म्हणाले की, “हिंदुस्थानी सैन्य मजबुतीने उभे आहे. आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी तयार आहेत.  निःसंशयपणे पाकिस्तानच्या प्रत्येक कारवाईला जशास तसे उत्तर देऊ. पाकिस्ताननने कुठलीही कारवाई करुदे मग ती राज्य पुरस्कृत दहशतवाद असो वा देशातील घुसखोरी असो प्रत्येक कारवाईला सडेतोड उत्तर देण्याची ताकद सैन्यात आहे.”