उच्च न्यायालयाने महापालिकेला फटकारले; ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करा! आज सकाळी 11 वाजेपर्यंतची मुदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधेरी-पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत बृहन्मुंबई महापालिकेच्या आडून कुटील राजकारण करणाऱया मिंधे गटाला गुरुवारी उच्च न्यायालयाने जबरदस्त झटका दिला. शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा शुक्रवारी सकाळी 11 वाजण्यापूर्वी मंजूर करा, असे स्पष्ट आदेश देत न्यायालयाने पालिका प्रशासनाच्या मनमानी कारभाराची लक्तरे काढली. राजीनामा मंजूर करण्यात तुम्हाला काय अडचण आहे? त्यांच्या निवडणूक लढविण्याच्या हक्कामध्ये खो का घालताय, असे संतप्त सवालही खंडपीठाने यावेळी उपस्थित केले. न्यायालयाच्या या भूमिकेमुळे ऋतुजा लटकेंच्या उमेदवारीचा मार्ग सुकर झाला आहे.

शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी-पूर्व विधानसभा मतदारसंघातील जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी 3 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 14 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. या निवडणुकीत शिवसेनेतर्फे रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके रिंगणात उतरणार आहेत. त्या महापालिकेत लिपिक पदावर सेवेत असल्याने निवडणुकीपूर्वी या पदाचा राजीनामा देणे बंधनकारक आहे. त्यानुसार ऋतुजा यांनी नियमांनुसार आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करून राजीनामा सादर केला आहे; मात्र राजकीय दबावामुळे महापालिका प्रशासनाने त्यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही. त्यामुळे ऋतुजा लटके यांनी ज्येष्ठ वकील अॅड. विश्वजित सावंत यांच्यामार्फत उच्च न्यायालयात दाद मागितली. त्यांच्या याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर दोन सत्रांमध्ये सुनावणी झाली. यावेळी महापालिकेच्या वतीने अॅड. अनिल साखरे यांनी महापालिका सेवा नियमावलीतील नियम 28 मधील तरतुदींवर बोट ठेवत ऋतुजा यांच्या अर्जावर आक्षेप घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यावर नाराजीचा सूर आळवत खंडपीठाने महापालिका प्रशासनाच्या आडमुठय़ा भूमिकेचे कडक शब्दांत वाभाडे काढले आणि ऋतुजा लटके यांना मोठा दिलासा दिला.

उद्या (शुक्रवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. अर्जदार ऋतुजा यांच्या निवडणूक लढवण्याच्या हक्काच्या आड का येताय? त्यांना त्यांचा पालिकेतील लिपिक पदाचा राजीनामा मंजूर केल्याचे रीतसर पत्र शुक्रवारी सकाळी 11 वाजण्यापूर्वी द्या, असा स्पष्ट आदेश खंडपीठाने पालिका आयुक्तांना दिला. न्यायालयाच्या या आदेशामुळे राजकीय दबावातून शिवसेनेच्या उमेदवारीमध्ये आडकाठी आणणारे महापालिका प्रशासन चांगलेच तोंडावर आपटले, तर पालिकेच्या आडून कुटील राजकारण करणाऱया मिंधे गटाला जबरदस्त झटका बसला आहे. शिवसेनेच्या वतीने माजी परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली हा न्यायालयीन लढा लढण्यात आला. सुनावणीवेळी ऋतुजा लटके न्यायालयात हजर होत्या. न्यायालयाच्या निर्णयानंतर विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर, उपविभागप्रमुख अनिल खांडेकर, नगरसेवक संदीप नाईक तसेच अन्य कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या आवारात जल्लोष केला.

पालिका संशयाच्या भोवऱयात; अचानक नव्या तक्रारीचे नाटक

पहिल्या सत्रात झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने पालिकेची चांगलीच खरडपट्टी काढली आणि निर्णय देण्यात चालढकल का करताय  ते ताबडतोब सांगा, असे निर्देश दिले होते. त्यावर दुपारच्या सत्रात पालिकेची बाजू मांडताना अॅड. अनिल साखरे यांनी ऋतुजा लटके यांच्याविरोधात 12 ऑक्टोबरला गैरव्यवहाराची तक्रार दाखल झाली असून, त्याची चौकशी होणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद केला. त्यावर ऋतुजा यांचे वकील विश्वजित सावंत यांनी त्यावर गंभीर संशय व्यक्त केला. न्यायालयानेही पालिकेच्या आडमुठय़ा व पक्षपाती भूमिकेवर आश्चर्य व्यक्त केले. ऋतुजा तुमच्या कर्मचारी आहेत. त्यांना त्यांचा हक्क द्यायला टाळाटाळ का करताय, असे विचारत न्यायालयाने पालिका प्रशासनाला धारेवर धरले.

पालिकेचा पक्षपातीपणा

ऋतुजा लटके यांच्या वकिलांनी 2012 मधील एका प्रकरणाचा दाखला देत पालिकेचा पक्षपातीपणा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. हेमांगी वरळीकर यांनीही 2012 मध्ये निवडणूक लढवण्यासाठी पालिकेची नोकरी सोडली होती. त्या पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत होत्या. त्यावेळी त्यांचा राजीनामा एका महिन्याच्या आत मंजूर करण्यात आला होता. मग ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारतानाच नियमांवर बोट का ठेवले जातेय? राजीनामा मंजूर करण्यासाठी चालढकल का केली जातेय? असे सवाल अॅड. विश्वजित सावंत यांनी उपस्थित केले. पालिका प्रशासनाने राजकीय कटकारस्थानाला हातभार लावू नये, असाही युक्तिवाद त्यांनी केला.

पालिकेच्या भूमिकेवर कोर्टाची संतप्त निरीक्षणे

महापालिका आयुक्तांनी ऋतुजा लटकेंच्या अर्जावर मनमानी तसेच जाचक स्वरूपाची भूमिका घेतल्याचे दिसतेय. त्यांनी आपल्या विशेषाधिकाराचा योग्य वापर केलेला नाही. ऋतुजा यांचा राजीनामा मंजूर करण्याच्या बाबतीत ते कुटील हेतूने वागलेत. जाणूनबुजून राजीनामा अजून मंजूर केला नसल्याचे दिसतेय.

ऋतुजा यांच्या राजीनाम्याचा निर्णय प्रलंबित का ठेवलाय? तुमच्या विशेषाधिकारावर देखरेख ठेवण्याचा न्यायालयाला अधिकार आहे हे लक्षात ठेवा. आम्हाला प्रकरणाची सगळी परिस्थिती जाणून घ्यायचीय.

कोर्ट संतापले

ऋतुजा तुमच्या कर्मचारी आहेत. त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यावर हो किंवा नाही एवढेच उत्तर तुम्हाला द्यायचेय. हा मुद्दा एवढा महत्त्वाचा का बनवला आहात? आमचा ताण आणखी वाढवू नका. आमच्याकडे आधीच खूप प्रकरणे प्रलंबित आहेत. तुम्ही निर्णय न दिल्यामुळे दुर्दैवाने हे प्रकरण आमच्यापुढे आले आहे. 

आज अर्ज भरणार

ऋतुजा रमेश लटके उद्या म्हणजेच शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता अंधेरी (पूर्व) गुंदवली मनपा शाळेत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्याआधी सदर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अंधेरी पूर्व गणेश मंदिर, मालपा डोंगरी येथून 9.30 वाजता मिरवणूक फेरीस सुरुवात होईल. यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिलीप वळसे-पाटील, मुंबई काँग्रेस अध्यक्ष आमदार भाई जगताप, काँग्रेस नेते सुरेश शेट्टी, विभागप्रमुख अॅड. अनिल परब, शिवसेना सचिव अनिल देसाई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी महाआघाडीचे इतर नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत.