
दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्वदरम्यान धावणाऱया मेट्रो-7 वरील स्थानकाच्या नामांतरावरून वाद निर्माण झाला आहे. दिंडोशी मेट्रो स्थानकाचे नाव पठाणवाडी करावे अशी मागणी करत एका संस्थेने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर याचिकाकर्त्याने 1 लाख रुपये कोर्ट रजिस्ट्रीकडे जमा केले असून खंडपीठाने याप्रकरणी एमएमआरडीएला दोन आठवडय़ांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
मेट्रो-7 मार्गावरील मालाड पूर्व येथील मेट्रो स्थानकाला पठाणवाडीऐवजी दिंडोशी नाव दिल्याने ‘नई रोशनी’ या सेवाभावी संस्थेने आक्षेप घेत ऍड. अल्ताफ खान यांच्यामार्फत हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली. 2010 साली केंद्र सरकारने मालाड येथील मेट्रो स्थानकाला पठाणवाडी नाव देण्याचे निश्चित केले होते, मात्र 2020 साली एमएमआरडीएच्या आयुक्तांनी राजकीय दबावापोटी स्थानकाचे नाव दिंडोशी केले.
एमएमआरडीएच्या नियमानुसार, एखाद्या ठिकाणी दोन मेट्रो स्थानक येणार असतील तर दुसऱया ठिकाणी त्या परिसरातील ऐतिहासिक किंवा विभागाचे अतिपरिचित नाव देण्यात येते. मेट्रो-2 मध्ये मालाड स्थानक असल्यामुळे मालाड पूर्व येथील मेट्रो-7 च्या स्थानकाला पठाणवाडी हे परिसरातील परिचित नाव देण्याचे निश्चित केले होते. दुसरीकडे, मेट्रो स्थानकाजवळच एक उड्डाण पूल असून तो पठाणवाडी या नावाने ओळखला जातो. तेथील बेस्टच्या थांब्यालाही पठाणवाडी असेच नाव आहे. त्यामुळे मेट्रो स्थानकाला पठाणवाडी असे नाव द्यावे अशी विनंती याचिकेतून करण्यात आली आहे. तसेच दिंडोशी हा परिसर या मेट्रो स्थानकापासून साधारणतः दीड किलोमीटर लांब आहे. त्यामुळे या मेट्रोने प्रवास करणाऱया प्रवाशांची गैरसोय होऊ शकते. स्थानकाच्या नावामुळे त्यांची गफलतही होऊ शकते, असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे.
या याचिकेवर आज न्यायमूर्ती अनिल मेनन आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. तेव्हा याचिकाकर्त्यांनी एक लाख रुपये अनामत रक्कम भरल्याची माहिती खंडपीठाला दिली. न्यायमूर्तींनी याची दखल घेत एमएमआरडीएची बाजू मांडणाऱया ऍड. अक्षय शिंदे यांना दोन आठवडय़ांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.

























































