जुगार अड्ड्यावर धाड टाकणारे पाच पोलीस निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। हिंगोली

सेनगाव तालुक्यातील कोळसा येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकणाऱ्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी निलंबित केले आहे. जुगार धाडीत ताब्यात घेतलेल्या ग्रामसेवकाच्या मृत्यूचे निमित्त या निलंबनासाठी कारणीभुत ठरले आहे. जुगार अड्ड्यावर धाड टाकल्यानंतर एखादी अप्रिय घटना घडुन निलंबनासारखी कारवाई होऊ नये, असे म्हणत पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल यामुळे खच्ची झाले असुन यापुढे धाडी टाकायला जाताना सोबत वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णवाहिका न्यायची का? असा सवाल पोलीस कर्मचारी करत आहेत.

हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या धाडीमध्ये ताब्यात घेतलेले ग्रामसेवक गोपाळराव बेंगाळ यांचा दुदैवी मृत्यू झाला. नाना पोले नावाच्या पोलिसाने मारहाण केल्यामुळे रक्तदाब वाढुन बेंगाळ यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला. पोलिसांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मयताच्या नातेवाईकांनी घेतली. याप्रकरणात पोलीस खरेच दोषी असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायलाच हवा, असे काही पोलिसांनीच सांगितले. मात्र, जमावाला शांत करण्याच्या प्रयत्नात धाड टाकणाऱ्याया पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करत असल्याची घोषणा पोलीस अधिकाऱ्यांनी केली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे हे प्रकरण हाताळण्यासाठी सेनगावात गेले होते. या घोषणेची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी करुन पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत केले आहे. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमुळे अस्वस्थतेची भावना पसरली आहे. यापुढे आम्ही अवैध धंदे, मटका, जुगार, सट्टा पेढीवर धाडी टाकायसाठी जायचे की नाही, असा प्रश्न एका पोलीस कर्मचाऱ्याने उपस्थित केला.

पोलीस अधीक्षक योगेश कुमार हे नॉनकरप्ट व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणुन ओळखल जातात. मात्र, कायद्याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी व्हावी आणि पोलीस कर्मचाNयांवरही अन्याय होऊ नये, असे पोलीस कर्मचारी बोलुन दाखवत आहेत. जिल्ह्यात अवैध धंद्याविरुध्द धाडसत्र करण्याचे फर्मान पोलीस अधिक्षकांनी काढले आहे. पोलिसांची वर्दी म्हणजे त्यांच्या अंगावरील खाकी कपडे आहेत. कोळशात जुगार अड्ड्यावर धाड टाकणाऱ्या या पोलिसांना निलंबीत करुन त्यांच्या अंगावरील खाकीचे कपडे तात्पुरते उतरवुन घेण्यात आले आहेत. त्यामुळे एसपी किमान पोलीसांचे कपडे तरी सांभाळा, अशी चर्चा पोलीस दलात होत आहे.