हिंगोली जिल्ह्याचे भूमिपुत्र नानाजी देशमुख यांना ’भारतरत्न’ पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। हिंगोली

प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते चंडिकादास अमृतराव देशमुख उपाख्य नानाजी देशमुख यांना मरणोत्तर यावर्षीचा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ’भारतरत्न’ प्रजासत्ताक दिनी घोषणा करण्यात आल्याने हिंगोली जिल्ह्याभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

जिल्ह्यातील कडोळी येथील एका सर्वसामान्य कुंटूबात चंडीकादास अमृतराव देशमुख उपाख्य नानाजी देशमुख यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1916 रोजी झाला. नानाजी देशमुख यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. लहानपणीच त्यांचे मातृछत्र हरपले. भाजी विकून आणि मंदिरात राहून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सानिध्यात राहून विविध पदेही भूषविली. त्यामुळे सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील नानाजी देशमुख यांना भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. त्यामुळे कडोळी गावासह हिंगोली जिल्ह्याला देश पातळीवर नावलौकिक मिळाला आहे.

भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळालेले नानाजी देशमुख यांचे महाराष्ट्राच्या मातीशी खूप जुने ऋणानुबंध होते. नानाजी देशमुख यांची कर्मभूमी राजस्थान आणि उत्तर प्रदेश असली तरी त्यांचे जन्मभूमी महाराष्ट्र आहे. नानाजी देशमुख यांची उच्च शिक्षणासाठी बिर्ला इन्स्टीट्युट या नामांकित संस्थेत निवड झाली आणि त्यांचे जीवनच बदलून गेले. स्वावलंबन, स्वयंशिस्त आणि संस्कार हे त्रिगुण नानाजी देशमुख यांच्या अंगी होते. त्यांनी उच्च शिक्षण पुर्ण करताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात सामील झाले. नानाजी देशमुख यांची मेहनत, राष्ट्रीय विचार आणि समाज सेवेची आवड बघुन सरसंघ चालक डॉ. केशव हेडगेवार यांनी त्यांच्यावर प्रांत प्रचारक म्हणून उत्तर प्रदेशाची जबाबदारी सोपविली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धूरिणांनी स्थापन केलेल्या भारतीय जनसंघ या राजकीय पक्षाचे नानाजी देशमुख पहिले सरचिटणीस होते. त्यांच्यावर उत्तर प्रदेशाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. नानाजी देशमुख यांचे सर्वच पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध होते. डॉ. राम मनोहर लोहीया यांच्या माध्यमातून त्यांनी समाजवादी मंडळीशी जवळीक साधली. याचा फायदा 1977 च्या निवडणुकीत जनसंघाला झाला. त्यापूर्वी 1967 मध्ये उत्तर प्रदेशात चरणसिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसशी सरकार सत्तेवर आणण्यात नानाजी देशमुख यांचे मोठे योगदान होते. त्यामुळे चरणसिंग यांनी नानाजींना चाणाक्य अशी उपाधी दिली. आणीबाणी नंतर सत्तेवर आलेल्या मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये सामील होण्याकरिता नानाजी देशमुख यांना अनेक दिग्गजांनी विनंती केली. परंतू, वयाची साठी ओलांडलेल्या मंडळींनी सत्तेपासून दुर राहावे असे विचार असल्याने त्यांनी नम्रपणे नकार कळविला. लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रवादी विचारांनी प्रेरीत झालेल्या नानाजी देशमुख यांनी सामाजिक कार्याचा यज्ञच सुरु केला. 1980 साली सक्रिय राजकारणातून संन्यास घेतलेल्या नानाजी देशमुख यांनी सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून दिले. दिनदयाल शोध संस्था आणि चित्रकूट ग्रामोद्यय विश्व विद्यालय या संस्था नानाजी देशमुख यांनी स्थापन केल्या. नानाजी देशमुख यांच्या कार्याची दखल घेऊन 19999 साली तत्कालीन एनडीए सरकारने नानाजी देशमुख यांची राज्य सभेवर निवड केली. कृषी, ग्रामद्योग, सार्वजनिक, आरोग्य, ग्रामीण, अर्थव्यवस्था या क्षेत्रात नानाजी देशमुख यांचे उत्तुंग योगदान आहे. दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यातही नानाजींनी पाणलोट क्षेत्र विकास आणि शैक्षणिक कार्य केले आहे. जल, जंगल, जमिन, शिक्षण आणि लोक जीवन नानाजी यांच्या कार्याचे बलस्थान राहिले आहे.
लोकसहभागातुन लोकजीवन हे त्यांच्या कार्याचे सुत्र राहिले आहे. तंटामुक्त गाव ही नानाजी देशमुख यांची संकल्पना, चित्रकुट येथे त्यांनी पहिले आदर्श ग्राम उभारले आहे. सरकारने नानाजी देशमुख यांच्या सामाजिक, शैक्षणिक व ईतर कार्याची दखल घेऊन 1999 मध्ये पद्म विभुषण पुरस्काराने नानाजी देशमुख यांचा सन्मान केला. 27 फेब्रुवारी 2010 रोजी वयाच्या 95 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यू पत्रातील इच्छेनुसार नानाजीवर कोणतेही अंतिम संस्कार करण्यात आले नाही. त्यांचे पार्थिव अखिल भारतीय आर्युविज्ञान संस्थेला देण्यात आले. दरम्यान, यावर्षी भारत सरकारने देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणुन ओळखला जाणारा ’भारतरत्न’ पुरस्कार प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांना मरणोत्तर जाहीर केल्याने हिंगोली जिल्ह्यासह मराठवाड्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ’भारतरत्न’ पुरस्कार नानाजी देशमुख यांना जाहीर झाल्यामुळे कडोळी गावासह हिंगोली जिल्ह्याचे नाव संपुर्ण देशात चमकले आहे. हा पुरस्कार नानाजी देशमुख यांना जाहीर झाल्याचे समजताच कडोळी गावासह हिंगोली जिल्हाभरात ठिकठिकाणी आनदोत्सव साजरा करुन नानाजी देशमुख यांना अभिवादन करण्यात आले.