
समुद्राने वेढलेल्या मुंबई नगरीच्या संरक्षणासाठी ब्रिटिशांनी लावलेल्या ऐतिहासिक तोफा आता पालिकेच्या उद्यानांचे सौंदर्य वाढवणार आहेत. या तोफांमधील 164 वर्षे जुन्या भरभक्कम दोन पोलादी तोफा पालिकेच्या घाटकोपर परिसरात असणाऱया ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’मध्ये आहेत. या तोफांना नवी झळाळी देऊन पर्यटकांचे आकर्षण वाढवले जाणार आहे. अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असल्याची माहिती उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.
पालिकेच्या उद्यान विभागाच्या अखत्यारीत असणाऱया घाटकोपर पूर्व परिसरातील ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’ सन 1971 पासून मुंबईकरांच्या सेवेत असणारे उद्यान आहे. 55 हजार 843 चौरस फुटांच्या जागेत विकसित केलेले आहे. या उद्यानात हिरवाईसोबतच ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या काळातील दोन तोफादेखील आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत.
या दोन्ही तोफांची लांबी 3.10 मीटर असून तोफांचा आतील घेर हा 0.64 मिटर आणि बाहेरील घेर 1.17 मीटर इतका आहे. या दोन्ही तोफांवर 1956 अशी नोंद असून एका बाजूला रोमन लिपीमध्ये ‘एन सीपीसी’ अशी अक्षरे कोरण्यात आली आहेत. साधारणपणे 164 वर्षे जुन्या असणाऱया या दोन्ही तोफांना नवी झळाळी देण्यासह त्या भव्य-दिव्य चबुतऱयावर पुनर्स्थापित करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या उद्यान विभागाने पालिकेच्या पुरातन वास्तू जतन अभियंता यांच्याकडे नुकताच पाठविला आहे. यामुळे आता लवकरच या ऐतिहासिक ठेव्याला नवी झळाळी मिळणार आहे.
























































