धडधडीत खोटे बोलून इतिहास बदलता येत नाही; राहुल गांधी यांनी भाजपला सुनावले

देशाचे विभाजन करू पाहणाऱया शक्तींशी कुणी हातमिळवणी केली होती याला इतिहास साक्षीदार आहे. राजकीय मंचांवरून धडधडीत खोटे बोलून हा इतिहास काही बदलणार नाही, असा सणसणीत टोला आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपला लगावला. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप असल्याची टीका वारंवार करणाऱया भाजपचे पितळ राहुल यांनी या जबरदस्त प्रत्युत्तरामुळे उघडे पाडले आहे.

2024 ची ही लोकसभा निवडणूक ही दोन विचारसरणींमधील लढाई आहे. भारताला नेहमीच एकसंध ठेवणारी काँग्रेस एका बाजूला आणि ज्यांनी नेहमीच लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे ते दुसऱया बाजूला अशी ही लढाई आहे, असे राहुल गांधी यांनी एक्सवर हिंदीतून केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

इतिहास साक्षीदार आहे

देशाची फाळणी करू पाहणाऱया शक्तींशी हातमिळवणी करून कोणी त्यांना बळ दिले आणि देशाच्या एकात्मतेसाठी आणि स्वातंत्र्यासाठी कोण लढले याचा इतिहास साक्षीदार आहे, असे गांधी म्हणाले. भारत छोडो आंदोलनाच्या वेळी इंग्रजांच्या पाठीशी कोण उभे होते? जेव्हा भारतातील तुरुंग काँग्रेस नेत्यांनी भरले होते तेव्हा देशाचे विभाजन करणाऱया शक्तींसोबत राज्यांमध्ये सरकार कोण चालवत होते? हे सर्वच जाणतात. हा इतिहास राजकीय व्यासपीठावरून खोटे बोलून बदलता येणार नाही, असेही ते म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

मोदींना भीती

या निवडणुकांत भाजप 180 जागांचा आकडा तरी पार करतो की नाही याची भीती वाटायला लागल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू-मुस्लिम अशी तीच ती जुनी टेप वाजवत आहेत. वास्तविक, जनसंघाचे संस्थापक, तत्कालीन हिंदू महासभेचे अध्यक्ष श्यामा प्रसाद मुखर्जी हेच 1940च्या दशकाच्या सुरुवातीला मुस्लिम लीगसोबत बंगालमधील युती सरकारचा भाग होते, असे प्रत्युत्तर काँग्रेसने भाजपला दिले आहे.