दुपारी चारनंतर हॉटेल्स, दुकाने सुरू राहता कामा नये; पोलीस सहआयुक्तांचे सक्त आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोविड-19 च्या अनुषंगाने लागू असलेल्या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी झालीच पाहिजे. दुपारी चार वाजल्यानंतर आस्थापना बंद झालीच पाहिजे. याची सर्वांनी कटाक्षाने नोंद घेऊन कार्यवाही करावी, असे आदेश सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलीस दलाला दिले आहेत. शिवाय नागरिकांनीदेखील सहकार्य करावे, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी राज्यात निर्बंध घालण्यात आले आहेत. असे असले तरी दुपारी चारनंतर काही  दुकाने, हॉटेल्स उघडी राहत असल्याचे सर्रास दिसून येते.  हे अत्यंत चुकीचे असून यामुळे पोलिसांची प्रतिमा जनमानसात मलीन होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱयांनी याची गंभीर दखल घेऊन दुपारी चारनंतर दुकाने, हॉटेल्स सुरू राहणार नाही याची काळजी घ्यावी. आपल्या कार्यक्षेत्रात अशा स्वरूपातले प्रकार  होणार नाहीत याची आपण स्वतः खात्री करावी.  तसेच लागू असलेल्या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे आदेश पोलिसांनी देण्यात आले आहेत. तसेच नागरिक आणि दुकान मालकांनीदेखील निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनदेखील नांगरे-पाटील यांनी केले आहे.