कोरोनाविरोधात सर्वसामान्य, व्यापाऱयांची एकजूट;पालिकेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद   

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, दंड, जनजागृतीबरोबर आता पालिकेने विविध समाजघटकांना सोबत घेत कोरोनाविरोधात यल्गार पुकारला आहे. घाटकोपरमध्ये राजावाडी परिसरात वाढती रुग्णसंख्येला आवर घालण्यासाठी पालिकेच्या साथीने परिसरातील खाऊगल्ल्यांसह 100 पेक्षा जास्त हॉटेल्स, स्टॉल, फेरीवाले, पानटपरीवाल्यांनी स्वेच्छेने आपले सर्व व्यवहार 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारपासून यांची सुरुवात झाली.

कोरोनाच्या लढय़ात सर्वसामान्य आणि स्थानिक दुकानदार, व्यापारी यांचाही सहभाग असेल तर ही लढाई जिंकता येईल, असे आवाहन करत सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी यांनी घाटकोपर पूर्व परिसरातील राजावाडी, पंतनगर, विक्रांत सर्कल या भागातील सर्वसामान्यांसह दुकानदार, व्यापारी, हॉटेल्स, फेरीवाले, नगरसेवक, आमदार, खासदार, समाजातील प्रतिष्ठत व्यक्ती यांच्याबरोबर बैठका लावून यावर सहमती घडवून आणली. त्याला प्रतिसाद देत सर्वांनी स्वेच्छेने आपले व्यवहार 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

घाटकोपर पश्चिममध्ये कोरोनाचे रुग्ण कमी आहेत. मात्र, घाटकोपर पूर्वमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण 75 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. अशा परिस्थितीत फक्त दंडात्मक कारवाईऐवजी सामाजिक बांधिलकी गृहीत धरून कृती करावी यासाठी सर्वसामान्यांसह व्यापारी, दुकानदार, हॉटेल, फेरीवाले, खाऊगल्ल्यांमधील सर्वांची मदत घेत व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. पालिकेच्या या आवाहनाला या सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 
-अजितकुमार आंबी, सहाय्यक आयुक्त 

मुंबईतील मॉल्स, रेल्वे स्टेशन आणि इतर गर्दीच्या ठिकाणी कोरोना चाचणी करण्यात भर देण्यात येत असून गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथेदेखील प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली . यावेळी आरोग्य समितीच्या सभापती प्रविणा मोरजकर यादेखील उपस्थित होत्या.