अंटार्टिकातील हिमनगांना वितळण्यापासून वाचवणार कृत्रिम हिमवृष्टी

59

सामना ऑनलाईन । लंडन

जागतिक तापमानवाढ ही गंभीर समस्या बनत आहे. त्यामुळे पश्चिम अंटार्टिका भागातील हिमनग वितळण्यापासून वाचवण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. हे हिमनग वितळण्यापासून वाचवण्यासाठी कृत्रिम हिमवृष्टी करण्याचा पर्याय वापरण्यात येणार आहे. कृत्रिम हिमवर्षाव करून हा प्रदेश बर्फाने झाकला जाईल आणि त्याचे वितळणे थांबवता येईल, असे नुकत्याच झालेल्या संशोधनातून पुढे आले आहे.

जागतिक तापमानवाढीमुळे हिमनग वितळून समुद्रकिनाऱ्याजवळील शहरांना धोका निर्माण झाला आहे. जागतिक तापमानवाढीमुळे दक्षिण अंटार्टिकामधील अनेक हिमनग वितळले आहेत. त्यामुळे या शतकात समुद्राच्या पाण्याची पातळी सुमारे 10 फूटांनी वाढली आहे. आता हिमनग वितळू नये, यासाठी संशोधकांनी हा प्रयोग सुचवला आहे. या प्रयोगानुसार 12 हजार टर्बाइन पंप बसवून समुद्राच्या पाण्याला 4 हजार 900 फुटांपर्यंत पंप करण्यात येणार आहे. त्यानंतर कृत्रिम हिमवृष्टी करून हे पाणी गोठवण्यात येणार आहे. त्यामुळे हिमनग समुद्रात सरकणार नाहीत आणि त्यांना वितळण्यापासून वाचवण्यात येऊ शकते, असे संशोधकांनी सांगितले. दक्षिण अंटार्टिकामध्ये हिमनग वितळल्याने गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे पश्चिम भागातील हिमनग वाचवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे जर्मनीचे प्राध्यापक आंद्रे लिव्हरमॅन यांनी सांगितले. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलांबाबत संशोधन करणाऱ्या पोस्टडॅम इन्स्टिट्यूटमध्ये लिव्हरमॅन प्राध्यापक आहेत.

पश्चिम अंटार्टिकातील हिमनग वितळल्यामुळे हॅमबर्ग, शांघाय, न्यूयॉर्क आणि हॉंगकाँग या शहरांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. हिमनग वितळण्याची प्रक्रिया अशीच सुरू राहिल्यास ही शहरे समुद्राच्या पाण्याखाली बुडण्याची भीती व्यक्त होत आहे. ग्रीनलंड आणि ऑर्टिक भागातील हिमनग वितळत असल्याने जगासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. जागतिक तापमानवाढ आणि हिमनग वितळण्याची समस्या योग्यवेळेत सोडवली नाही तर समुद्राची पाणी पातळी 16 फूटांपर्यंत वाढण्याचा धोका लिव्हरमॅन यांनी व्यक्त केला आहे. सुमारे 7400 गिगाटोन्सच्या कृत्रिम हिमवृष्टीमुळे गेल्या 10 वर्षात हिमनगांचे वितळणे काही अंशी कमी झाल्याचे संशोधकांनी सांगितले. ही समस्या सोडवण्यासाठी प्रदूषण रोखणे गरजेचे आहे. कृत्रिम हिमवृष्टीचा प्रयोग हा फक्त तात्पुरता आणि तातडीचा उपाय आहे. या भागातील हिमनगांना धोका निर्माण होऊ नये, यासाठी ही पावले उचलण्यात येत असल्याचे संशोधकांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या