
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
अभिनेत्रीने चित्रपटातील गाण्यादरम्यान डोळा मारल्याने धार्मिक भावना कशा दुखावतात आणि धर्माचा अपमान कसा होतो?, चित्रपटात कोणी तरी गाणं गातं आणि तुम्ही त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करता? तुमच्याकडे दुसरं काम नाही का, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने तेलंगणा सरकारला चांगलेच फटकारले. हा खटलाच उभा राहू शकत नाही असे सांगत कोर्टाने दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियर आणि चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक यांच्याविरुद्धचे सर्व एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले.
‘ओरू अदार लव्ह’ या दाक्षिणात्य चित्रपटातील ‘मणिक्य मलयारा पूवी’ या गाण्यामुळे गोत्यात आलेली अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरला सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी दिलासा दिला. ‘मणिक्य मलयारा पूवी’ या गाण्यातील नेत्रअदांमुळे प्रिया प्रकाश सोशल मीडियावर अल्पावधीत प्रसिद्ध झाली, मात्र या गाण्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत मुस्लिम संघटनांनी तिच्या विरोधात हैदराबादमध्ये पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी चित्रपटाचे दिग्दर्शक, अभिनेत्री आणि निर्मात्यांविरोधात महाराष्ट्र आणि तेलंगणात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या विरोधात प्रिया प्रकाशने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.




























































