सीबीएसई, आयसीएसईच्या टक्केवारीमुळे ‘एचएससी’च्या विद्यार्थ्यांचे वांदे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईतील नामांकित कॉलेजमधील एफवायच्या जागांवर यंदादेखील सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे वर्चस्व राहणार आहे. राज्य मंडळाच्या (एचएससी) बारावीच्या नव्वदीपार विद्यार्थ्यांची संख्या यंदा घटली. त्यातच सीबीएसई, आयसीएसई विद्यार्थ्यांना ‘छप्पर फाडके गुण’ मिळत असल्याने एचएससीच्या विद्यार्थ्यांचे एफवाय प्रवेशात वांदे होणार आहेत.

मिठीबाई कॉलेजचा बारावीचा निकाल 99.90 टक्के लागला आहे. कॉलेजमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इनहाऊस कोट्यात प्राधान्य दिले जात असल्याने बाहेरील विद्यार्थ्यांसाठी फारच कमी जागा शिल्लक राहणार आहेत. त्यामुळे एकेका जागेसाठी यंदा मोठी चुरस पाहायला मिळेल. कटऑफही चढाच राहणार असून मेरिट लिस्टमध्ये सीबीएसई, आयसीएसईचे सर्वाधिक विद्यार्थी राहणार असून कमी टक्केवारीमुळे एचएससीच्या विद्यार्थ्यांना दुय्यम कॉलेजमध्ये समाधान मानावे लागेल, असा अंदाज मिठीबाई कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजपाल हांडे यांनी व्यक्त केला.

सायन्सच्या कटऑफमध्ये फारसा फरक नाही

मुंबई विभागाच्या बारावीच्या सायन्सच्या निकालात यंदा सर्वाधिक 6.76 टक्क्यांची घसरण झाली आहे. मुंबई विभागातील 73 हजार 963 विद्यार्थी सायन्स शाखेत उत्तीर्ण झाले असून विद्यार्थ्यांची टक्केवारी कमी असल्याने कटऑफमध्ये  फारसा फरक पडणार नाही. ‘जेईई’, ‘नीट’सारख्या स्पर्धा परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचे कॉलेजकडून मिळणार्‍या विषयांच्या सखोल ज्ञानाकडे दुर्लक्ष होत आहे. कोचिंग क्लासमधून विद्यार्थी फक्त जेईई, नीट, ‘क्रॅक’ करण्याचेच धडे घेत आहेत. बहुपर्यायी प्रश्नांच्या सरावामुळे सायन्सचा निकाल खालावल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले.

एफवायची प्रवेश क्षमता

शाखा            जागा

सायन्स              68,940

कॉमर्स              1,68,348

आर्टस्               60,028

लॉ                   10740

फाइन आर्टस्       520

टेक्नॉलॉजी          3,08,79

 

विद्यार्थ्यांचा कल स्वायत्त कॉलेजांकडे

अभ्यासक्रमात होणारा बदल, विषयांमध्ये असलेले नावीन्य, शिकविण्याची पद्धत यामुळे बारावीनंतर विद्यार्थ्यांचा कल स्वायत्त कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याकडे आहे. मुंबई विद्यापीठांतर्गत नामांकित 26 स्वायत्त कॉलेजे असून कॉमर्स आणि आर्टसच्या प्रवेशासाठी या कॉलेजमध्ये चढाओढ पाहायला मिळेल, असे सोमय्या कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. विजय जोशी यांनी स्पष्ट केले.