राजस्थानात तरुणाचा ‘शोले’ स्टाईल ड्रामा; जबानीत दिले चक्रावणारे उत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शोले चित्रपटातील धमेंद्र पाण्याच्या टाकीवर चढतो, ते दृश्य खूप लोकप्रिय झाले होते. त्यानंतर विविध मागण्या मान्य करण्यासाठी अनेकांनी या स्टाईलने आंदोलनही केले. राजस्थानात अशीच एक घटना उघडकीस आली आहे. एक तरुण एका पिंपळाच्या झाडावर चढला होता. ग्रामस्थांनी समजावल्यानंतरही तो खाली उतरण्यास तयार नव्हता. प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतर त्याला खाली उतरवण्यात आले. त्यावेळी त्याने या कृत्याचे कारण सांगितल्यावर सगळेच चक्रावले.

राजस्थानातील धौलपूरमधील भदोरिया पाड्यात एक युवक सकाळीच पिपंळाच्या झाडावर चढला होता. तो त्या झाडावर 50 फूटांच्या उंचीपर्यंत गेला. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थानी त्याला समजावत खाली उतरण्याच्या सूचना केल्या. मात्र, तो कोणाचेच ऐकत नव्हता. त्यानंतर त्याने झाडावरच आपले दोन्ही पाय फांदीला बाधून घेतले.

घटनेचे गांभीर्य बघून गावकऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो खाली येण्यास तयार नव्हता. पोलिसांनी झाडाखाली गाद्या अंथरल्या आणि क्रेन बोलावून त्याला खाली उतरवण्याचे प्रयत्न केले. कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, याची काळजी घेत तरुणाला खाली उतरवण्याचे प्रयत्न करण्यात आले.

क्रेनद्वारे शिड्या लावून या तरुणाला खाली उतरवण्यात पोलीस आणि प्रशासनाला यश आले. त्यामुळे यंत्रणांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर तरुणाची चोकशी करण्यात आली. आपली पत्नी दोन वर्षांपासून माहेरी गेली आहे. अनेकदा प्रयत्न करुनही ती घरी परत येण्यास तयार नाही. तसेच या प्रकरणी आपली कोणीही मदत करत नसल्याने नैराश्येने आपण हे पाऊल उचलल्याचे तरुणाने सांगितले. तरुणाचे नाव लहोरेराम भदौरिया आहे. तो याच भागात राहतो.

आपल्या साररच्यांनी पत्नी संगीता हिला खोटे सांगत माहेरी नेले आणि दोन वर्षांपासून ते तिला परत येऊ देत नाही, असे त्याने सांगितले. आपण पोलीस आणि प्रशासनाकडेही मदत मागितली. मात्र, त्यांनी मदत करण्यास नकार दिला. तसेच नातेवाईक आणि मित्रही आपल्याला मदत करत नसल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे पत्नीला आपली व्यथा समजावी, यासाठी आपण झाडावर चढलो होतो, जोपर्यंत ती परत येणार नाही, आपण झाडावरून उतरणार नाही, असे ठरवले होते. त्यासाठी झाडावर चढल्यावर पाय बांधल्याचेही त्याने सांगितले.

तरुणाने दिलेल्या या उत्तराने पोलीस, प्रशासन आणि ग्रामस्थही चक्रावले आहेत. तरुणाने पुन्हा असे काही करू नये म्हणून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, असे उपजिल्हाधिकारी राधेश्याम मीणा यांनी सांगितले. तरुणाची मानसीक तपासणी करून त्याची बायको माहेरी का गेली, ती परत का येत नाही, याची माहिती घेणार असून ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.