रीत एकांकिका स्पर्धेत ‘हायब्रीड’ची बाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन वर्षांच्या ‘ब्रेक’नंतर तरुणाईच्या उत्साहाने आणि जल्लोषाने भरून वाहणारा एकांकिका स्पर्धांचा माहोल पुन्हा रंगू लागला आहे.  ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे रीत क्रिएशन आणि रीत चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित रीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. या स्पर्धेत बाजी मारली ती ‘हायब्रीड’ या एकांकिकेने तर उपविजेता एकांकिका ठरली ‘संपर्क क्रमांक’ आणि ‘बिलिमारो’ या एकांकिकेला विशेष परीक्षक सन्मानाने गौरवण्यात आले.

रीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत राज्यभरातून तब्बल 39 संघांनी सहभाग घेतला. ऑनलाइन पद्धतीने झालेल्या प्राथमिक फेरीतून तब्बल 6 एकांकिकांची महाअंतिम सोहळ्यासाठी निवड करण्यात आली. यामध्ये स्टोरीया प्रॉडक्शनची ‘सवारी भवानी चौकामधी’, ढ मंडळी कुडाळ यांची ‘बिलिमारो’, इंद्रधनू मुंबई यांची ‘मानलेली गर्लफ्रेंड’, प्राण मुंबई यांची ‘जनावर’, अॅबस्ट्रक्ट आर्ट डोंबिवली यांची ‘हायब्रीड’ आणि मैत्रेय थिएटर यांची ‘संपर्क क्रमांक’ या एकांकिका सादर झाल्या.

ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक विजय पाटकर आणि लेखक-दिग्दर्शक हृषिकेश कोळी हे परीक्षक  होते. महाअंतिम सोहळ्याच्या पारितोषिक वितरणास ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, दिग्दर्शक विजू माने, अभिनेत्री प्रार्थना बेहरे आदी मान्यवर उपस्थित होते.