
रशिया आणि युक्रेन यांच्यात कधीही युद्धाला सुरुवात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जर अमेरिका युक्रेनच्या बाजूने युद्धात उतरली तर ती तिसऱ्या विश्वयुद्धाची सुरुवात असेल असं म्हटलं जातंय. यामुळेच अमेरिकेने कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमचे सैनिक युक्रेनला पाठवणार नाही असं म्हटलंय. तणावाच्या या परिस्थितीत पाश्चिमात्य देश सातत्याने तणाव निवळावा यासाठी प्रयत्न करताना दिसतायत, मात्र त्याला फारसं यश आलेलं नाहीये. अतिरप्रगत देशांना जे जमत नाहीये ते मी करून दाखवतो असा दावा एका जादूगाराने केला आहे. माझ्याकडे असलेल्या शक्तींचा वापर करून मी रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवतो आणि जगाचा तिसऱ्या विश्वयुद्धापासून बचाव करतो असं या जादूगाराने म्हटलंय.
युरी गेलर (75 वर्षे) हा जगप्रसिद्ध जादूगार असून त्याचे लोकांच्या मनातील विचार ओळखण्याचे खेळ प्रसिद्ध आहेत. युरी गेलरने म्हटलंय की तो हे युद्ध त्याच्या शक्ती वापरून सहजपणे थांबवू शकतो, मात्र त्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन किंवा युक्रेनच्या वरिष्ठ नेतृत्वाने आपली मदत मागावी अशी अट युरीने ठेवली आहे. मनाच्या ताकदीने चमचे वाकवण्याचे खेळ दाखवून जगभरात प्रसिद्धी मिळवणाऱ्या युरीने म्हटलंय की त्याने याआधीही काही युद्धे रोखली आहेत आणि रशिया विरूद्ध नाटो सदस्यांमधील हे युद्धही तो सहजपणे रोखू शकतो.
इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन यांनी तणाव निवळावा यासाठी पुतिन यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करून पाहिला आहे, मात्र त्यात त्यांना यश आलेलं नाहीये. रशियाने त्यांचे किमान 1 लाख 30 हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर सज्ज केले आहेत. बड्या मंडळींचे प्रयत्न करून झाल्यानंतर युरीने म्हटलंय की, ‘त्यांना जे जमलं नाही ते मी करून दाखवतो, मात्र त्यासाठी मला रितसर विनंती करण्यात यायला हवी. विनंती करण्यात आल्यानंतर मी त्यावर नीट विचार करेन आणि मगच पुढची पावले उचलेन.’ तो हे कसं करणार हे मात्र सांगण्यास युरीने नकार दिला आहे. युरीने यापूर्वी दावा केला होता की त्याने बोरीस जॉन्सन यांना 2019 च्या निवडणुकीत विजयी होण्यासाठी मदत केली होती. इस्रायली पंतप्रधान गोल्डा मायर यांनी आपल्याला दिलेला एक चमचा मी जॉन्सन यांना दिला होता आणि त्यामुळे त्यांचा विजय झाला असं युरीचं म्हणणं आहे.
ताबडतोब देश सोडा, युक्रेनमधील अमेरिकेच्या नागरिकांना बायडेन यांचे आवाहन
अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी युक्रेनमधील अमेरिकेच्या नागरिकांना ताबडतोब देश सोडण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनामुळे रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध अटळ असल्याचे मानले जात आहे. अमेरिका कोणत्याही परिस्थितीत युक्रेनमध्ये आपले सैनिक पाठवणार नाही असेही बायडेन यांनी बजावले आहे. जर रशियाने हल्ला केल्यानंतर अमेरिकेचे नागरीक तिथे अडकले तर त्यांनाही माघारी आणण्यासाठी सैनिक पाठवणार नाही असे बायडेन म्हणाले आहेत. जर रशिया आणि अमेरिकेच्या सैनिकांनी एकमेकांवर गोळ्या झाडायला सुरुवात केली तर ते विश्वयुद्ध असेल असं सांगत बायडेन यांनी अमेरिकेचे सैनिक युक्रेनमध्ये का जाणार नाही हे स्पष्ट केले.
अमेरिकेने त्यांच्या नागरिकांसाठी एक सूचना जारी केली आहे. रशिया आणि युक्रेनमधील ताणल्या गेलेल्या संबंधांमुळे युक्रेनला अजिबात जाऊ नका जे आधीपासून युक्रेनमध्ये आहेत त्यांनी अत्याधिक सुरक्षा बाळगावी आणि युक्रेनमधील अमेरिकी नागरिकांनी व्यावसायिक किंवा खासगी जो मार्ग मिळेल त्या मार्गाने तो देश सोडावा असं या सूचनेत म्हटले आहे. अमेरिका त्यांच्या नागरिकांना ज्या सूचना देते त्यांच्या गंभीरतेचे चार स्तर असतात. युक्रेनबाबत देण्यात आलेली सूचना ही अतिगंभीर स्वरुपाच्या स्तराची आहे.
अमेरिकेने त्यांच्या युक्रेनमधील नागरिकांना इशारा देताना म्हटलंय की कोणत्याही क्षणी लष्करी कारवायांना सुरुवात होऊ शकेल. या कारवाया कोणत्याही इशाऱ्याशिवाय सुरू होण्याची भीती आहे. या लष्करी कारवाईचा युक्रेनमधील अमेरिकेच्या दूतावासातर्फे पुरवण्यात येणाऱ्या मदतीवरही परिणाम होण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत दूतावास अमेरिकी नागरिकांना देशाबाहेर काढण्यात असमर्थ ठरू शकेल असा इशाराही अमेरिकेने दिला आहे.
रशियाने युक्रेनच्या सीमेवर अडीज लाख सैनिक जमा केले आहेत. रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करू शकतो. रशियाने मात्र आपण हल्ला करणार नाही असं म्हटलंय. युक्रेन नाटोत सहभागी होण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रशियाने केला आहे. नाटोच्या आडून अमेरिका आणि त्यांचे मित्र देश रशियावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा रशियाला संशय आहे.

























































