
सामना प्रतिनिधी । ब्रिस्टॉल
श्रीलंका व बांगलादेश या आशियाई देशांमध्ये उद्या वर्ल्ड कपमध्ये ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळणार आहे. श्रीलंकन संघाने आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांमध्ये एक सामन्यात विजय मिळवत तीन गुणांची कमाई केलीय, तर बांगलादेशने तीन सामन्यांमधून एक विजयासह दोन गुणांवर मोहोर उमटवलीय. त्यामुळे दोन संघांमध्ये उद्या होणारी लढत ही उभय संघाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणार आहे. दोन्ही संघांसाठी या लढतीत विजय महत्त्वाचा ठरणार आहे.
पाऊस खेळखंडोबा करणार…
श्रीलंका व बांगलादेश यांच्यामध्ये उद्या होणार्या लढतीत पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. सकाळच्या सत्रात जास्त प्रमाणात पावसाच्या सरी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून दुपारच्या सत्रात पावसाचा जोर कमी होईल. पण याचा फटका लढतीवर पडेल एवढं मात्र निश्चित आहे.
फलंदाजांना सर्वस्व पणाला लावावे लागणार
महेला जयवर्धने, कुमार संगक्कारा, तिलकरत्ने दिलशान या स्टार खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर श्रीलंकन संघात पोकळी निर्माण झालीय. दिमुथ करुणारत्नेच्या नेतृत्वाखाली खेळणार्या श्रीलंकन संघातील फलंदाजांना सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. दिमुथ करुणारत्नेसह कुशल मेंडिस, कुशल परेरा, अँsजेलो मॅथ्यूज, थिसारा परेरा यांना बांगलादेशच्या गोलंदाजांचे आव्हान थोपवून लावावे लागणार आहे. याचसह लसिथ मलिंगा, सुरंगा लकमल या गोलंदाजांनाही बांगलादेशच्या फलंदाजांना रोखावे लागणार आहे.
सातत्यपूर्ण कामगिरीची गरज
बांगलादेशने पहिल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेला हरवत दमदार सुरुवात केली. त्यानंतर केन विल्यमसनच्या न्यूझीलंडने त्यांना हरवले. यजमान इंग्लंडकडून त्यांचा धुव्वा उडाला. मात्र तरीही त्यांच्या उपांत्य फेरीत धडक मारण्याच्या आशा कायम आहेत. बांगलादेशच्या खेळाडूंना कामगिरीत सातत्य राखण्याची गरज आहे. शाकिब अल हसन, मुशफिकर रहीम, तमीम इक्बाल, मश्रफी मोर्तझा, महमुद्दूलाह या अनुभवी खेळाडूंना युवा खेळाडूंची योग्य साथ मिळाल्यास त्यांचा प्रवास सोप्पा असेल.
आजची लढत
श्रीलंका – बांगलादेश ब्रिस्टॉल, दुपारी तीन वाजता



























































