
देशातील कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता द कॉन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्सने (सीआयएससीई) दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 16 एप्रिलला परिपत्रक जारी करून बोर्डाने दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला होता, मात्र सध्याची परिस्थिती पाहून दहावीच्या परीक्षाच बोर्डाकडून रद्द केल्या आहेत.
बारावी परीक्षेविषयी सीआयएससीईने पूर्वीचाच निर्णय कायम ठेवला आहे. जूनच्या पहिल्या आठवडय़ात बारावी परीक्षा होणार की नाही हे बोर्डाकडून स्पष्ट केले जाणार आहे. सीआयएससीईचे सचिव जेरी अराथून यांनी मंगळवारी याविषयी भूमिका स्पष्ट केली. दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे असेल तसेच निकाल कधीपर्यंत जाहीर होईल याविषयी बोर्डाकडून सविस्तर सूचना लवकरच जाहीर केल्या जातील, असेही जेरी अराथून यांनी सांगितले आहे. देशातील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सुरक्षेला प्राधान्य असल्याचेही जेरी यांना म्हटले आहे.
अकरावीचे ऑनलाइन वर्ग सुरू करण्याच्या सूचना
सीआयएससीई बोर्डाशी संलग्नित ज्युनियर कॉलेजना अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच वेळापत्रक तयार करून ऑनलाइन वर्गही सुरू करण्याच्या सूचना बोर्डाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

























































