
सामना प्रतिनिधी । वरळी
‘आयडीबीआय फेडरल लाइफ इन्शुरन्स’ या हिंदुस्थानातील आघाडीच्या लाइफ इन्शुरन्स कंपनीने ‘द सी हॉक्स फाऊंडेशन’सोबत द ट्रिब्यूट रनचे आयोजन केले आहे. 26/11 मुंबई हल्ल्याच्या घटनेला दहा वर्षे झाल्याच्या पार्श्वभूमीवर हल्ल्यात शहीद झालेले व मुंबईच्या धाडसी वृत्तीला ट्रिब्यूट रनच्या माध्यमातून सलाम करण्यात येणार आहे. रविवारी 25 नोव्हेंबर रोजी नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) येथून द ट्रिब्यूट रनला सुरुवात होईल. मुंबईमध्ये या उपक्रमाची घोषणा करण्यात आली त्यावेळी आयडीबीआय फेडरल लाइफ इन्शुरन्सचे चीफ मार्केटिंग ऑफिसर कार्तिक रमण, स्पर्धा आयोजक मयांक व्यास सिंग आणि नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडियाचे (एनएससीआय) अध्यक्ष जयंतीलाल शाह यांची उपस्थिती होती. यासोबतच सरलाबेन पारेख, अतिरिक्त पोलीस आयुक्त (दक्षिण विभाग) प्रवीण पडवळ, मुंबई पोलीस, माजी पोलीस आयुक्त व पब्लिक कन्सर्सन फॉर गव्हर्नन्स ट्रस्ट या सेवाभावी संस्थेचे फाऊंडर जुलिओ रिबेरो आणि आंतरराष्ट्रीय फिटनेस ऍथलीट व फिटनेस ट्रेनर निशरिन पारीख हेही मान्यवर उपस्थित होते. द ट्रिब्यूट रनमध्ये तीन वेगवेगळ्या गटांचा समावेश करण्यात येणार आहे, ज्यामध्ये 21 किमी (अर्धमॅरेथॉन), 10 किमी आणि 5 किमी गटाचा समावेश आहे. यासोबत इच्छुक http://www.thetributerun.in या संकेतस्थळावर देखील आपली नावे नोंदवू शकतात.


























































