
शिवसेनेचे दोन पदाधिकारी बबन गावकर आणि विजय कामतेकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भायखळाच्या शाखेत जाऊन पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. घडलेल्या घटनेची विचारपूस केल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांकडून आतापर्यंतच्या कारवाई बद्दल माहिती घेतली. तसेच शिवसैनिकांचं संरक्षण करणार नसाल तर हात वर करा, आम्ही आमचं संरक्षण करायला समर्थ आहोत, अशा कडक शब्दात भूमिका मांडली.
‘तुम्ही एफआयआर का घेतला नाही?’ असा सवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना विचारला. तसेच ‘वेडवाकडं झालं तर त्याला तुम्ही जबाबदार असाल’, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. ‘तुम्ही राजकारणात पडू नका. राजकारणात आम्हाला काय करायचं ते आम्ही करू. लढायचं तर लढू. पण जीवाशी खेळ होणार असेल तर ते खपवून घेणार नाही. शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागला तर तुम्ही सगळे जबाबदार राहणार. शिवसैनिकांचं रक्त सांडू नये म्हणून मी शांततेचं आवाहन करतो. पण हे राजकारण नाही, सूडाचं राजकारण झालं’, असंही ते म्हणाले.
हल्ला झालेल्या व्यक्तींना संरक्षण न देता संशयित हल्लेखोरांना संरक्षण दिल्याची तक्रार यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी पक्षप्रमुखांकडे केली. त्यावेळी ‘ज्यांना संरक्षण दिलं आहे त्यांनी हल्ला केला असल्याचा सुगावा तुम्हाला लागला आहे का?’ असा सवाल करत संशयितांची चौकशी कधी करणार अशीही विचारणा त्यांनी केली. पुढे ते म्हणाले की, ‘शिवसैनिकांना संरक्षण द्या. नाही तर मग हात वर करा, आमचं संरक्षण आम्ही करू’, असंही ते म्हणाले. तसेच उपमुख्यमंत्र्यांनाही विचारा की कारवाई होणार की आम्ही आमचं संरक्षण आम्ही करू, असंही ते शिवसैनिकांना म्हणाले.































































