राज्यात आता अनेक ठिकाणी उन्हाच्या झळा जाणवत असून तापमानात वाढ झाली आहे. मात्र, हवामानात काही प्रमाणात बदल होत असल्याने राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यात काही ठिकाणी गारपीटीसह जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. त्याचा शेतीला मोठा फटका बसला आहे. आता राज्यात काही ठिकाणी उन्हाच्या झळा जाणवणार असून काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने व्रतवली आहे.
राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामधील काही भागांमध्ये येत्या दोन दिवसात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही ठिकाणी यलो अलर्टही देण्यात आला आहे. पुढच्या तीन दिवसांमध्ये ठिकठिकाणी ढगाळ वातावरण असेल आणि तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडतील, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. मात्र, मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र, पुण्यात किमान तापमान वाढल्याने उकाडा जाणवणार आहे.
छत्रपती संभाजीनगर, नगर, नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. काही भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी कोसळतील. तर पुणे, सांगली, सातारा, जालना, ठाणे, रायगड, नंदूरबार जिल्ह्यात काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच धाराशिव, बीड, सोलापूर या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी कोसळतील.
विदर्भातील वाशीम, नागपूर, चंद्रपूर, बुलडाणा, अकोला, अमरवती, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी तसेच खानदेशातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
























































