
कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असून दुसरी लाट भयंकर चित्र निर्माण करण्याची शक्यता आहे. गुरुवारी कोरोनाग्रस्तांच्या संख्येत 35 टक्के वाढ दिसली. गेल्या 24 तासात 72,330 नवे रुग्ण आढळले आहेत. यावर्षीचा हा एका दिवसातला सर्वात मोठा आकडा आहे. याचबरोबर बाधितांची संख्या वाढून 1,22,21,665 इतकी झाली आहे.
यादरम्यान 459 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, गेल्या काही महिन्यांमधला हा मोठा आकडा आहे. कोरोनामुळे एकूण मृतांचा आकडा 1,62,927 इतकी झाली आहे. चिंतेची बाब ही आहे की यावेळी रिकव्हरी रेट देखील खाली गेल्याचं चित्र आहे. गेल्या 24 तासात 40 हजार 382 लोक कोरोना संक्रमणावर मात करण्यात यशस्वी झाले आहेत. कोरोनामुक्तांची एकूण संख्या 1,14,74,683 इतकी झाली आहे आणि रिकव्हरी रेट कमी होऊन 93.89 टक्के झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाद्वारे जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार देशात सध्या कोरोनाच्या अॅक्टिव्ह केस 5 लाख 84 हजार 55 इतक्या आहेत. जो एकूण आकड्याच्या 4.78 टक्के इतका आहे. काही दिवसांपूर्वी ही संख्या 2 लाखाच्या खाली गेली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकड्यांनुसार देशात मृत्यदर देखील वाढून 1.33 टक्के झाला आहे.

























































