श्रीगोंद्यात अट्टल दुचाकीचोर गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेगवेगळ्या ठिकाणी पाळत राखून दुचाकींची चोरी करणाऱया सराईताला श्रीगोंदा पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून चोरून नेलेल्या दोन लाख 37 हजार रुपयांच्या चोरीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

रवींद्र विठ्ठल पवार (रा. साळवणदेवी रस्ता, श्रीगोंदा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ललित सुभाष गुगळे (रा. श्रीगोंदा) यांनी फिर्याद दिली होती.

ललित गुगळे यांची दुचाकी 19 डिसेंबर रोजी घरासमोरून चोरीला गेली होती. याबाबत गुगळे यांनी 21 डिसेंबर रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चोरीच्या घटनेचा तपास सुरू केला. दरम्यान, रवींद्र पवार याने गुगळे यांची दुचाकी चोरली असून, तो श्रीगोंदा बसस्थानकावर येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांच्या पथकाने सापळा लावून 13 जानेवारी रोजी रवींद्र पवार याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुह्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुह्यातील दुचाकीसह व इतर गुह्यातील चोरी केलेल्या सहा दुचाकी असा 2 लाख 37 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रवींद्र पवार याच्यावर यापूर्वी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. पोलीस हवालदार बी. एल. खारतोडे तपास करीत आहेत. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, कर्माचारी बी. एल. खारतोडे, पठाण, नवसरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.