INDvENG टीम इंडियाला धक्का, सराव लढतीत दुखापत झाल्याने 2 प्रमुख खेळाडू मालिकेतून बाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानच्या संघाला इंग्लंड दौऱ्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेचा शुभारंभ 4 ऑगस्टपासून होणार आहे. मात्र तत्पूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला असून सराव सामना खेळलेले दोन महत्त्वाचे खेळाडू दुखापतीमुळे आगामी मालिकेतून बाहेर झाले आहेत.

पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू होण्यापूर्वी हिंदुस्थानचा संघ काउंटी संघासोबत तीन दिवसांचा सराव सामना खेळत आहे. या सराव सामन्याचा आज तिसरा आणि अंतिम दिवस आहे. या लढतीत वेगवान गोलंदाज आवेश खान आणि अष्टपैलू खेळाडू वाशिंग्टन सुंदर यांना दुखापत झाली आहे. दोघांची दुखापत गंभीर असल्याने ते इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकणार आहेत.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, वाशिंग्टन सुंदर याच्या बोटाला दुखापत झाली आहे. तर दुसरीकडे आवेश खान याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले आहे. सराव सामन्याच्या पहिल्याच दिवशी आवेश खान याला दुखापत झाली होती, तर दुसऱ्या दिवशी सुंदरला दुखापत झाली. दोघेही आगामी काही आठवडे खेळू शकणार नाहीत, त्यामुळे ते कसोटी मालिकेसाठी उपलब्ध नसतील.

टीम इंडियाविरुद्ध सराव

दरम्यान, डरहम येथे सुरु असलेल्या सराव लढतीत वाशिंग्टन सुंदर आणि आवेश खान हे टीम इंडियाविरुद्ध खेळत होते. काउंटी संघातील काही खेळाडूंना दुखापत झाल्याने व काहींना कोरोनामुळे क्वारंटाईन करण्यात आल्याने टीम इंडियाचे हे दोन्ही खेळाडू काउंटी संघाकडून खेळत होते.

गुड न्यूज

हिंदुस्थानच्या संघासाठी एक गुड न्यूज असून यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आता कोरोनातून सावरला असून संघासोबत जोडला गेला आहे. लंडनमध्ये क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर तो संघात दाखल झाला असून आगामी सराव लढतीत आणि कसोटी मालिकेत तो हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करताना दिसेल.