Video – सिराज आणि लिटन दास यांच्यात तू तू मै मै! कोहलीची रिॲक्शन पाहून बोलती बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हा चितगाव येथे खेळला जात आहे. आजच्या दिवशी हिंदुस्थानी संघ ऑल आऊट झाला व त्यांचा पहिला डाव संपला. त्यानंतर बांगलादेशी संघ फलंदाजीसाठी उतरला. मात्र दुसऱ्या डावात हिंदुस्थानाने बांगलादेशच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडले आहे. बांगलादेशचे महत्त्वाचे फलंदाज 100 धावांचा पल्ला गाठण्याआधीच माघारी परतले. पण या सामन्याच्या दुसऱ्या डावात दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये काहीशी वादावादी झाली.

आजच्या सामन्या दरम्यान लिटन दास आणि मोहम्मद सिराज यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. या वादात स्लीपमध्ये उभ्या असलेल्या उत्साही विराट कोहलीने देखील उडी घेतली. ऑनफिल्ड असलेल्या अंपायरने मध्यस्ती करत हे प्रकरण कसेबसे शांत केले. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. मोहम्मद सिराज आणि लिटन दास यांच्यात झालेल्या वादामुळे नुकसान केवळ लिटन दासचेच झाले. आजच्या सामन्यात लिटन दास अवघ्या 24 धावा करून क्लीन बोल्ड झाला. लिटन दास बाद झाल्यानंतर विराट कोहलीही आक्रमकपणे सेलिब्रेशन करताना दिसला. यावेळी त्याने बांगलादेशी प्रेक्षकांनाही हातवारे केले आणि त्यानंतर या कसोटी सामन्याचे वातावरण एकदमच रंजक बनले.

नेमकी घटना काय घडली?

बांगलादेशच्या झटपट दोन विकेट्स पडल्यानंतर लिटन दास आणि झाकीर हसन यांनी बांगलादेशचा डाव सावरण्यास सुरूवात केली. लिटन दासने 30 चेंडूत 24 धावा करत आक्रमक सुरूवात केली होती. याचदरम्यान, मोहम्मद सिराज आणि त्याची 13 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शाब्दिक वादावादी झाली. सिराजने लिटन दासकडे पाहून काहीतरी म्हटले. तो काय म्हणतो हे ऐकू न आल्याने तो सिराजच्या दिशेने येत होता. त्यावेळी तो आपल्या कानाला हात लावत लक्ष देऊन ऐकण्याची नक्कल करत होता. दरम्यान, पंचांनी मोहम्मद सिराज आणि लिटन दास यांच्यात मध्यस्थी करत दोघांना बाजूला सारले.

मात्र 13 व्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर मोहम्मद सिराजने लिटन दासचा त्रिफळा उडवला. यावेळी सिराजने तोंडावर बोट ठेवत लिटनला आता शांतपणे घरी जा असे संदेश दिला. तर दुसरीकडे स्लीपमध्ये उभ्या असलेल्या विराट कोहलीने लिटन दासची कानावर हात ठेवून लक्षपूर्व ऐकत असल्याची नक्कल करत त्याची चेष्टा उडवली. सध्या सोशल मीडियावर याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे