INDvsENG पंतचा शतकी तडाखा, वाशिंग्टनची ‘सुंदर’ खेळी; हिंदुस्थानकडे निर्णायक आघाडी

अहमदाबाद येथे सुरू असलेल्या अंतिम कसोटीचा दुसरा दिवस ऋषभ पंतने गाजवला. पंतने केलेल्या दणदणीत शतकी खेळीने (101 धावा) टीम इंडियाला निर्णायक आघाडी मिळाली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा हिंदुस्थानच्या 7 बाद 294 धावा झाल्या असून 89 धावांची आघाडी घेतली आहे. वाशिंग्टन सुंदर 60 तर अक्षर पटेल 11 धावांवर नाबाद होता.

कालच्या 1 बाद 24 धावांवरून टीम इंडियाने आपला पहिला डाव आज सुरू केला. सकाळच्या सत्रामध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. फिरकीपुढे चाचपडत खेळणारा पुजारा 17 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला कर्णधार विराट कोहलीही स्टोक्सच्या एका उसळी घेणाऱ्या चेंडूवर यष्टीरक्षक फोक्सकडे झेल देऊन शून्यावर माघारी परतला. पाठोपाठ उपकर्णधार अजिंक्य रहाणे 27 आणि अर्धतकाजवळ पोहोचलेला रोहित शर्मा 49 काढून परतला. आर. अश्विनही 13 धावांवर बाद झाला.

पंतचे शतक

संपूर्ण मालिकेमध्ये जबरदस्त फॉर्मात असलेला ऋषभ पंत शतकापासून वंचित राहिला होता. मात्र आज वेगळ्याच मूडमध्ये खेळणाऱ्या पंतने सुरुवातीला सावध आणि नंतर आपला नैसर्गिक खेळ करत कारकीर्दीतील तिसरे शतक ठोकले. बाद होण्यापूर्वी पंतने 118 चेंडूचा सामना करताना 101 धावा ठोकल्या. यात त्याच्या 13 चौकारांचा आणि 2 षटकारांचा समावेश आहे.

वाशिंग्टनची ‘सुंदर’ खेळी

146 धावांवर सहा गडी गमावलेल्या हिंदुस्थानचा डाव वाशिंग्टन सुंदर आणि पंत यांनी सावरला. दोघांमध्ये शतकी भागिदारी झाली. पंतने शतक, तर सुंदरने अर्धशतक ठोकले. सुंदर अद्यापही मैदानात शड्डू ठोकून उभा असून त्याने 117 चेंडूत नाबाद 60 धावा केल्या आहेत.

निर्णायक आघाडी

दरम्यान, उद्या कसोटीचा तिसरा दिवस असून हिंदुस्थानकडे 89 धावांची निर्णायक आघाडी आहे. अखेरच्या तीन खेळाडूंनी आणखी योगदान दिल्यास टीम इंडियाकडे विजयाची नामी संधी आहे. हा सामना जिंकताच टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध लॉर्डसच्या मैदानात कसोटी चॅम्पियनशीपची फायनल खेळण्यासाठी पात्र ठरणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या