न्यूझीलंड दौऱ्यात सचिन, विरुच्या विक्रमाला धोनी लावणार सुरुंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानचा माजी कर्णधार आणि फिनिशर खेळाडू एम.एस. धोनीने नव्या वर्षाची सुरुवात झोकात केली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक मालिका विजयाचा हिरो ठरलेल्या धोनीचा मालिकावीर पुरस्काराने सन्मान करण्यात आला. आता हिंदुस्थानचा संघ छोट्याच्या विश्रांतीनंतर न्यूझीलंडमध्ये विजयाचा डंका वाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. हिंदुस्थानचा संघ येथे 5 एक दिवसीय सामने खेळणार असून या मालिकेत धोनी सचिनच्या विक्रमाला मोडीत काढण्याची शक्यता आहे.

न्यूझीलंडमध्ये धोनीने आतापर्यंत 10 एक दिवसीय सामने खेळले आहेत. यात त्याने 456 धावा केल्या आहेत. सचिनचा विक्रम मोडीत काढण्यासाठी धोनीला या मालिकेत 197 धावा चोपाव्या लागतील. सचिनच्या नावावर 18 सामन्यात 652 धावांची नोंद आहे. दुसऱ्या स्थानावर विरेंद्र सेहवाग असून त्याच्या नावावर 12 सामन्यात 598 धावांची नोंद आहे. चिन व विरुचा विक्रम मोडल्यास न्यूझीलंडमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम धोनीच्या नावावर जमा होईल.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दिले टिकाकारांना उत्तर
ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी धोनीच्या संघातील स्थानावर टिकाकारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिन्ही एक दिवसीय सामन्यात अर्धशतकीय खेळी आणि 190 च्या सरासरीने धावा चोपून धोनीने टिकाकारांना चोख उत्तर दिले.