INDvsNZ ‘टीम इंडिया’ला जिंकावेच लागेल! न्यूझीलंडला हरवून मालिका बरोबरीत सोडविण्याची संधी

हिंदुस्थान-न्यूझीलंडदरम्यान आज होणाऱ्या निर्णायक तिसऱ्या व अखेरच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यावर तमाम क्रिकेटशौकिनांच्या नजरा असतील. कारण हा अखेरचा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडविण्याची हिंदुस्थानला संधी असेल, तर यजमान न्यूझीलंडचा संघ मालिका विजयासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसणार आहे. न्यूझीलंडने सलामीचा सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे.

पाऊस पडल्यास टीम इंडियाला फटका

हिंदुस्थान-न्यूझीलंड दरम्यानच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाऊस पडण्याची 69 टक्के शक्यता असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे. पावसामुळे सामना रद्द झाल्यास हिंदुस्थानचे मोठे नुकसान होणार असून त्यांना मालिका गमवावी लागणार आहे. त्यामुळे हिंदुस्थानी संघ आज जिंकण्यासाठी कुठल्या योजनेसह मैदानावर उतरणार, याकडेही देशवासीयांच्या नजरा असतील.