
सामना प्रतिनिधी । अबुधाबी
हिंदुस्थानच्या फुटबॉल संघाच्या एएफसी आशियाई स्पर्धेतील आव्हानाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. ब्ल्यू टायगर्स म्हणून ओळखल्या जाणार्या हिंदुस्थानी संघासमोर सलामीच्याच लढतीत थायलंडचे आव्हान असणार आहे. यावेळी साखळी फेरीचा अडथळा हिंदुस्थानचा संघ ओलांडतो का हे पाहणे रंजक ठरणार आहे.
1964 साली उपविजेता
हिंदुस्थानला आतापर्यंत आशियाई स्पर्धेत फक्त चारच वेळा पात्र ठरता आले आहे. या संघाने 1964 साली सर्वोत्तम कामगिरी केली होती. त्यावेळी हिंदुस्थानचा संघ उपविजेता ठरला होता. त्यानंतर 1984 साली व 2011 साली पहिल्या फेरीतच गारद होण्याची नामुष्की हिंदुस्थानी संघावर ओढवली. यंदा या स्पर्धेत हिंदुस्थानी संघ कशी कामगिरी करतोय हे पाहायला नक्कीच आवडणार आहे.
आम्हाला सिद्ध करायचेय – कॉन्स्टेण्टाइन
आशियाई स्पर्धेसाठी आम्ही पात्र ठरू असे कोणालाही वाटले नसेल. आता आम्ही या स्पर्धेत खेळत आहोत. यामधील तिन्ही साखळी फेरीच्या लढतीत आम्ही विजयापासून दूरच राहू असा समज कित्येकांचा असेल. त्यामुळे दबाव हा मुळात आमच्या खेळाडूंवर नाहीए. पण आम्ही इथपर्यंत मजल मारण्यासाठी प्रचंड मेहनत केलीय. त्यामुळे आता सिद्ध करण्याची वेळ आलीय, असे स्पष्ट मत हिंदुस्थानी संघाचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेण्टाइन यावेळी म्हणाले.
सहा सामन्यांत केले 17 गोल
थायलंडच्या संघाने गेल्या काही महिन्यांत फुटबॉलच्या रणांगणात धडाकेबाज कामगिरी केलीय. त्यांनी सहा सामन्यांत चक्क 17 गोल केलेत. त्यामुळे हिंदुस्थानच्या बचावफळीला दक्ष राहावेच लागणार आहे. यावर स्टीफन कॉन्स्टेण्टाइन म्हणाले, आमचा बचाव त्यांना रोखण्यात यशस्वी होईल. अनास एडथोडिका व संदेश झिंगन यांच्यामध्ये प्रतिस्पर्ध्यांना बांधून ठेवण्याची क्षमता नक्कीच आहे.
हिंदुस्थानच्या लढती खालीलप्रमाणे
6 जानेवारी – थायलंड (अबुधाबी)
10 जानेवारी – यूएई (अबुधाबी)
14 जानेवारी – बहरीन (शारजाह)




























































