श्रेयसने दिल्ली गाठली, दुसऱ्या कसोटीसाठी हिंदुस्थानी संघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी क्रिकेट सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. पहिल्या कसोटीत दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला कसोटी स्पेशालिस्ट फलंदाज श्रेयस अय्यरचा दुसऱया कसोटीसाठी हिंदुस्थानी संघात समावेश करण्यात आला आहे.

हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी रात्री ही माहिती दिली. ‘श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीतून पूर्णतः सावरला आहे. बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (एनसीए) त्याला तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र दिले आहे. ‘बीसीसीआय’च्या वैद्यकीय पथकाकडून त्याच्या फिटनेसला ग्रीन सिग्नल मिळाला आहे,’ असेही ‘बीसीसीआय’कडून स्पष्ट करण्यात आले.

पहिल्या कसोटीत श्रेयस अय्यरच्या जागेवर सूर्यकुमार यादवला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली, मात्र नागपूर कसोटीत त्याला मिळालेल्या संधीचे सोने करता आले नाही. 20 चेंडूंत 8 धावा काढून तो बाद झाला होता. त्यामुळे दिल्ली कसोटीत सूर्यकुमारच्या जागेवर श्रेयसला खेळविणार की नागपूरमधील विजेता संघ कायम ठेवला जाणार हे बघावे लागेल.

पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर एक महिन्यापासून संघाबाहेर होता. फिटनेस सिद्ध करण्यासाठी त्याला रवींद्र जाडेजाप्रमाणे स्थानिक क्रिकेट खेळावे लागेल अशी चर्चा होती,  मात्र आता कसोटी स्पेशालिस्ट फलंदाज श्रेयस अय्यरच्या समावेशामुळे टीम इंडियाची ताकद वाढलेली असेल एवढे नक्की.