
बरोबर 23 वर्षांपूर्वी शारजाहमध्ये झालेल्या कोका कोला कप तिरंगी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत श्रीलंकेने 299 धावांचे लक्ष्य उभारल्यानंतर हिंदुस्थानचा डाव अवघ्या 54 धावांत गुंडाळत 245 धावांच्या महाविजयासह बाजी मारली होती. हा अंतिम सामन्यातील नीचांक होता. त्या पराभवाचा बदला घेताना हिंदुस्थानने श्रीलंकेचा अवघ्या 50 धावांत खुर्दा पाडला आणि 6.1 षटकांत विजयावर शिक्कामोर्तब केले.
2000 साली शारजात झालेल्या कोका कोला तिरंगी स्पर्धेच्या अंतिम फेरीत श्रीलंकेने सनथ जयसूर्याच्या 161 चेंडूंतील 21 चौकार आणि 4 षटकारांसह केलेल्या 189 धावांच्या विक्रमी खेळीने श्रीलंकेला 50 षटकांत 5 बाद 299 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली होती. या सामन्यातही नाणेफेक श्रीलंकेने जिंकली होती आणि आजही नाणेफेक त्यांनीच जिंकून प्रथम फलंदाजी घेतली होती. फरक इतकाच होता की, आज सिराज नावाचे वादळ घोंघावले. तेव्हा शारजाच्या वाळवंटात आधी सूर्य तळपला आणि मग चामिंडा वासने कहर केला.
दानवीर सिराज! ‘सामनावीर’ म्हणून मिळालेली बक्षिसाची रक्कम ग्राऊंड्समनना अर्पण केली
श्रीलंकेचे 300 धावांचे आव्हान हिंदुस्थानच्या दिग्गजांनी पेलवलेच नाही. सचिन तेंडुलकर (5), सौरभ गांगुली (3), युवराज सिंग (3) आणि विनोद कांबळी (3) या सुपरस्टार्सना वासच्या मार्याने 18 धावांतच बाद झाले. हिंदुस्थानच्या घसरगुंडीला कुणीच रोखू शकला नाही. केवळ रॉबिन सिंग (11) हाच एकटा दोन अंकी धावसंख्या करू शकला. अन्य सारे फलंदाज एकेरी धावसंख्येतच बाद झाले. वासने 14 धावांत 5 तर मुरलीधरनने 6 धावांत 3 विकेट घेत हिंदुस्थानला वन डे इतिहासातील सर्वात दारुण पराभवाची झळ पोहोचवली होती. आज 23 वर्षांनंतर रोहित शर्माने त्या पराभवाची सव्याज बदला घेत आशिया चषकावर आपले नाव कोरले.