हिंदुस्थानची गरिबीमुक्तीकडे वाटचाल; दहा वर्षांत 27 कोटी जनता दारिद्र्य़ातून बाहेर

88

सामना ऑनलाईन । संयुक्त राष्ट्र

विविध क्षेत्रांत प्रगती साधत असलेल्या हिंदुस्थानची नजीकच्या काळात गरिबीतून मुक्तता होण्याची चिन्हे आहेत. आरोग्य, शालेय शिक्षण आदी क्षेत्रांतील प्रगतीमुळे अनेक कुटुंबे गरिबीच्या दलदलीतून बाहेर पडली आहेत. 2006 ते 2016 या दहा वर्षांत 27 कोटी 10 लाख लोक गरिबीतून मुक्त झाल्याचे संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले आहे.

जेवणासाठीचे इंधन, साफसफाई आणि पोषण यांसारख्या क्षेत्रात झपाटय़ाने प्रगती झाल्याचे संयुक्त राष्ट्राच्या पाहणीत आढळून आले आहे. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी) आणि ऑक्सफर्ड पॉवर्टी ऍण्ड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटीव्ह (ओपीएचआय) यांच्यातर्फे गुरुवारी वैश्विक बहुआयामी गरीबी निर्देशांक जारी करण्यात आला. यातून हिंदुस्थानची प्रगती पुन्हा एकदा जगाच्या निदर्शनास आली आहे.  सर्वेक्षणकर्त्यांनी केवळ उत्पन्न विचारात न घेता आरोग्याची वाईट स्थिती, कमी दर्जाचे काम तसेच हिंसाचाराचा धोका या बाबींचादेखील अभ्यास केला. हिंदुस्थानमध्ये 2005-06 साली जवळपास 64 कोटी लोक गरिबीत जगत होते. हे प्रमाण 2015-16 मध्ये 36.9 कोटींवर आले.

आपली प्रतिक्रिया द्या