जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप; मेरी कोमचे सातवे पदक पक्के

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mary-kom

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

हिंदुस्थानच्या खेळाडूंनी मंगळवारी बॉक्सिंग रिंगमध्ये प्रतिस्पर्ध्यांना दमदार पंचेस मारत चार पदके निश्चित केली. अनुभवी बॉक्सर मेरी कोम हिने 48 किलो वजनी गटात (लाइट फ्लाय वेट) उपांत्य फेरीत धडक मारून जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधील सातवे पदक पक्के करताना इतिहास रचला, तर लवलीना बोर्गोहेन हिने 69 किलो वजनी गटात, सिमरनजीत कौरने 64 किलो वजनी गटात आणि सोनिया चहलने 57 किलो वजनी गटात सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. आता या चौघींचे किमान कांस्य पदक पक्के झाले आहे. मात्र पदकाचा रंग प्रत्यक्षात कोणता असेल हे लवकरच कळेल.

मणिपूरच्या मेरी कोमने चीनच्या वू यू हिचा 5-0 असा धुव्वा उडवला आणि पदक जिंकण्याकडे वाटचाल केली. जागतिक बॉक्ंिसग चॅम्पियनशिपमध्ये सात पदके जिंकणारी ती पहिलीच खेळाडू ठरलीय हे विशेष! आसामच्या लवलीना बोर्गोहेनने ऑस्ट्रेलियाच्या स्कॉट के हिला 5-0 असे सहज हरवले. सोनिया चहल हिने येनी कॅसतेनाडावर 4-1 अशा फरकाने मात केली. सिमरनजीत कौर हिने अॅमी ब्रॉडहर्स्ट हिला 3-1 असे नमवले. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या नियमांचे पालन न करता गैरवर्तणूक करणाऱ्या स्टॅनीमीरा पेत्रोवा हिचे ऑक्रिडेशन कार्ड घेण्यात आले आहे. मात्र ती स्पर्धेतून आधीच बाद झाली आहे.