>> मंगेश वरवडेकर
अमित रोहिदासला 17 व्या मिनिटालाच रेड कार्ड दाखवल्यामुळे दहा खेळाडूंनिशी खेळणाऱ्या हिंदुस्थानने तरीही ब्रिटनच्या नाकात दम आणला. गोलरक्षक पी. आर. श्रीजेश हिंदुस्थानचा रक्षक बनला आणि शेवटपर्यंत गोलपोस्टची खिंड लढवत ब्रिटनच्या संघाला पेनल्टी शूट आउटमध्ये 4-2 ने हरवत ऑलिम्पिकमध्ये आपणच ग्रेट असल्याचे पुन्हा दाखवून दिले. टोकियो ऑलिम्पिकमध्येही ब्रिटनलाच नमवत हिंदुस्थानने उपांत्य फेरी गाठली होती. आज त्याचीच पुनरावृत्ती केली. 11 पेनल्टी कॉर्नर अडवत श्रीजेशने ब्रिटिश खेळाडूंना अक्षरशः रडकुंडीला आणले. तोच खऱ्या अर्थाने हिंदुस्थानच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
पहिल्या मिनिटापासून आक्रमक झालेल्या हिंदुस्थानी हॉकीपटूंनी पहिल्या क्वार्टरमध्ये ब्रिटनवर वर्चस्व गाजविले. उभय संघांना 3-3 पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण गोल करण्यात दोन्ही संघांना अपयश आले. हिंदुस्थानचा अनुभवी गोलरक्षक श्रीजेशने दोन अडवले, तर एक पेनल्टी कॉर्नर अमित रोहितदासने वाचविला.
रोहितदासला रेड कार्ड अन् हिंदुस्थानवर दडपण
पहिला क्वाटर गोलशून्य बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या क्वाटरला सुरुवात होताच 17 व्या मिनिटाला अमित रोहितदासला पंचांनी रेडकार्ड दाखविले. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूच्या तोंडाला जाणीवपूर्वक हॉकी स्टीक मारल्याबद्दल दोषी ठरवत त्याच्यावर कारवाई करण्यात आली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रेड कार्ड मिळाल्याची ही पहिलीच घटना होय. मग राहिलेल्या दहा खेळाडूंनिशी खेळणाऱ्या हिंदुस्थानी संघावर कमालीचे दडपण आले. तरीही 22 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर कर्णधार हरमनप्रीत सिंहने भन्नाट गोल करीत हिंदुस्थानचे खाते उघडले. पॅरिस ऑलिम्पिकमधील त्याचा हा सातवा गोल ठरला. 27व्या मिनिटाला ली मॉर्टनने पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत इंग्लंडला 1-1 अशी बरोबरी साधून दिली.
ब्रिटनचे आक्रमक अन् हिंदुस्थानचा बचाव
मध्यंतरानंतर ब्रिटनने एक खेळाडू कमी असलेल्या हिंदुस्थानी गोटात सातत्याने हल्ले चढविले. हिंदुस्थानची संरक्षण फळी आणि गोलरक्षक पी.आर. श्रीजेश मोठया शिताफीने हे हल्ले परतवून लावत होते. मैदानावर उभय संघांच्या पाठीराख्यांनी मोठी गर्दी केली होती. ‘भारत माता की जय’ आणि ‘जितेगा भाई जितेगा, हिंदुस्थान जितेगा’ अशा घोषणा देत हिंदुस्थानी पाठीराखे आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देत होते. इंग्लंडच्या चाहत्यांनीही ‘कम ऑन ब्रिटन’च्या घोषणा देत हिंदुस्थानी चाहत्यांना प्रत्युत्तर दिले. मैदानावरील खेळाडूंमधील संघर्ष आणि प्रेक्षकांची नारेबाजी यामुळे हिंदुस्थान-ब्रिटन लढतीला एक वेगळीच धार चढली होती. चेंडूवर बहुतांश ब्रिटनचाच ताबा होता. ते सातत्याने हिंदुस्थानच्या डी कोर्टमध्ये येऊन गोल करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत होते. त्यांना पेनल्टी मागून पेनल्टी मिळत होत्या, मात्र हिंदुस्थानच्या संरक्षण फळीने डी कोर्टवर जिगरबाज खेळ केला. शिवाय गोलरक्षक श्रीजेशने डोळय़ात तेल घालून गोलपोस्टपुढे पहारा देत ब्रिटनचे सर्व मनसुबे उधळून लावले. गोलरक्षक श्रीजेश आणि गोल वाचविण्यासाठी जिवाचे रान करणाऱ्या हिंदुस्थानी खेळाडूंचा जयघोष करीत चाहत्यांनी स्टेडियम दणाणून सोडले. शेवटी निर्धारित वेळेत ही लढत 1-1 अशी बरोबरीत सुटली.
शूटआऊटमध्ये ब्रिजेशचा बचाव
शूटआऊटच्या थरारात हिंदुस्थानकडून हरमनप्रीत सिंह, सुखजीत सिंह, ललित उपाध्याय व राजकुमार पाल यांनी ब्रिटनच्या गोलरक्षकाला चकवित भन्नाट गोल केले, मात्र ब्रिटनकडून जेम्स एल्वेरी व जॅक वॅलिस यांनाच गोल करता आले. 2-2 अशा बरोबरीनंतर हिंदुस्थानी गोलरक्षक श्रीजेशने ब्रिटनच्या कोनोर विल्यम्सन व फिलिप रॉपर यांचे गोल अडवून हिंदुस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. लागोपाठच्या दोन ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानकडून स्वप्नांचा चक्काचूर झालेल्या ब्रिटनच्या खेळाडूंना मैदानावर अश्रू अन् हुंदके अनावर झाले. इंग्लंडच्या समर्थकांनीही निराशेने स्टेडियम सोडले. दुसरीकडे हिंदुस्थानी चाहत्यांनी गगनभेदी जल्लोषाने या विजयाचा आनंद साजरा केला.