
>> रणवीर राजपूत
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ज्या नेत्यांनी मोठं योगदान दिलं, त्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव मोठय़ा सन्मानाने घेतलं जातं. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी अहिंसा व सत्याग्रह या तत्त्वांवर देशाला स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जो लढा उभारला, त्यात वल्लभभाई हे अग्रस्थानी राहिले. या लढय़ादरम्यान त्यांना महात्मा गांधी यांच्यासमवेत अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. दरम्यान इंग्लंडमध्ये बॅरिस्टर पदवी संपादन केल्यावर त्यांनी काही काळ खेडा, बोरसद अन् बारडोली येथे वकिली केली, परंतु इंग्रजांच्या गुलामगिरीतून हिंदुस्थान देशाला मुक्त करण्यासाठी त्यांनी वकिली सोडून गांधीजींच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थान स्वातंत्र्य लढय़ात थेट उडी घेतली.गुजरातमधील शेतकऱयांना संघटित करून त्यांनी इंग्रजांच्या जुलूमशाहीविरुद्ध रणशिंग फुंकले.त्यानंतर त्यांची गणना प्रमुख नेत्यांमध्ये होऊ लागली. त्यांनी कराची येथे झालेल्या हिंदुस्थानी राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष पद भूषविले. त्यांचा हिंदुस्थानी राष्ट्रीय काँग्रेस पक्षावर मोठा दबदबा होता. देशाच्या स्वातंत्र्य लढय़ामध्ये त्यांनी दिलेलं बहुमोल योगदान हिंदुस्थानींच्या चिरकाल स्मरणात राहील, हे निश्चित.
सन 1928 मध्ये शेतकऱयांवर लादलेल्या ब्रिटिश सरकारच्या जुलमी कर आकारणीच्या विरोधात सरदार पटेल यांनी तीव्र आंदोलन छेडलं. महत्त्वाचे म्हणजे मिठाच्या सत्याग्रहात इंग्रज पोलिसांकडून पकडले जाणारे ते एक प्रमुख नेते होते. याबद्दल त्यांना 1932 मध्ये 16 महिने येरवडा तुरुंगात तर एक वर्ष नाशिक कारागृहात शिक्षा भोगावी लागली. तथापि, वल्लभभाई यांनी जेलमधून बाहेर येताच विदेशी मालाची जाहीर होळी करून स्वदेशी मालाचा वापर करण्यास हिंदुस्थानींना आवाहन केलं. वल्लभभाईंनी सर्वधर्मीय लोकांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवून, ब्रिटिश राजवट उलथून टाकण्यासाठी त्यांना संघटित केलं. वल्लभभाई हे विदेशी कपडे त्यागून खादीचे कपडे वापरण्यावर शेवटपर्यंत आग्रही राहिले.1942 च्या ‘चले जाव’ (क्विट इंडिया मूव्हमेंट) आंदोलनातही ते आघाडीवर होते.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सरदार वल्लभभाई पटेल यांना देशाचे पहिले उपपंतप्रधान अन् गृहमंत्री होण्याचा मान मिळाला. गृहमंत्री असताना त्यांनी पाकिस्तानमधून निर्वासित म्हणून आलेल्या नागरिकांना दिल्ली व पंजाबमध्ये जागा देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. इतकेच नव्हे तर फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सरदार पटेल यांनी मोलाचं योगदान दिलं. देश स्वतंत्र झाल्यानंतर हिंदुस्थानातील 565 अर्धस्वायत्त संस्थानांचे हिंदुस्थानात विलिनीकरण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. राजकीय मुसद्देगिरी अन् सैन्य बळाच्या जोरावर त्यांनी या संस्थानांचे विलिनीकरण करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यामुळे जनमानसात त्यांची प्रतिमा अधिकच उजळून निघाली. या पार्श्वभूमीवरच हिंदुस्थानींनी त्यांना ‘पोलादी पुरुष’ ही उपाधी दिली. सरदार पटेल हे मुक्त व्यापार आणि खासगी मालकी हक्काचे समर्थक होते. देशाच्या फाळणीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. हिंदुस्थानची एकता, अखंडता व सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी आपलं सारं आयुष्य पणाला लावलं.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्वातंत्र्य लढय़ातील भरीव योगदानाबद्दल कृतज्ञता बाळगून स्वातंत्र्य प्राप्तीनंतर त्यांच्या नावाने गुजरात आणि महाराष्ट्रात अनेक शैक्षणिक संस्था सुरू करण्यात आल्या. याशिवाय सरदार सरोवर डयाम, सरदार पटेल इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक, सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल मेमोरियल, सरदार पटेल युनिव्हर्सिटी, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्ट, सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग आदी तत्सम संस्था त्यांच्या नावाने उभारून त्यांना समर्पित करण्यात आल्या. हीच आहे खरी फलश्रुती सरदार पटेल यांच्या देशाप्रती असलेल्या समर्पण वृत्तीची!
उल्लेखनीय बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नर्मदा नदीच्या केवडिया कॉलनीच्या निसर्गरम्य परिसरात सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वाधिक उंच असा भव्यदिव्य ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ हा पुतळा उभारण्यात आला आहे. हिंदुस्थानींसाठी ही प्रेक्षणीय वास्तू खऱया अर्थाने सर्वांसाठी पर्यटनाचं आकर्षक स्थळ बनल्याने लाखो विदेशी व परदेशी पर्यटक त्यास भेटी देऊन पर्यटनाची मजा लुटत असतात. या पुतळ्याची उंची 182 मीटर असून त्यावर अंदाजे 3,000 कोटी खर्च झाल्याचे सांगण्यात येते. हा पुतळा पूर्णतः कास्याने बनविला असून त्यासाठी सुमारे 1850 टन कास्य वापरलं गेलं आहे. हा पुतळा पद्मश्री राम सुतार या ज्येष्ठ मराठी शिल्पकाराने साकारला असून त्यासाठी सुमारे 2500 कर्मचाऱयांनी अथक परिश्रम घेतले. सदर पुतळ्याचे अनावरण 31 ऑक्टोबर 2018 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते मोठय़ा थाटामाटात संपन्न झाले.
याशिवाय पेंद्र सरकारने 31 ऑक्टोबर हा दिवस ‘राष्ट्रीय एकता दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. खरं तर हीच सरदार पटेल यांना खरी आदरांजली ठरेल. वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जीवनात ‘सरदार, पोलादी पुरुष’ यासह युनिफायर ऑफ इंडिया, बिस्मार्क ऑफ इंडिया, फाऊंडर ऑफ रिपब्लिक ऑफ इंडिया, प्याट्रोन सेंट ऑफ इंडियाज सिव्हिल सर्वंटस् या उपाध्या प्रदान करण्यात आल्या. महत्त्वाचे म्हणजे हिंदुस्थान सरकारने सरदार पटेल यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित केलं. देशाप्रती जाज्वल्य राष्ट्रप्रेम अन् देशाभिमान बाळगणाऱया थोर स्वातंत्र्यसेनानी सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंती दिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन!




























































