
सामना ऑनलाईन । प्रॉव्हिडन्स
पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना हिंदुस्थानी संघ जेव्हा मैदानावर येऊ लागला तेव्हा डाव सुरू होण्याआधीच एकही चेंडू न खेळता हिंदुस्थानच्या खात्यात 10 धावा जमा झाल्या होत्या. त्यामुळे क्रिकेट चाहते अवाक् झाले. पण त्याचे कारणही तसेच होते. हिंदुस्थानला मैदानात उतरण्याआधीच मिळालेले 10 गुण ही पाकिस्तानला देण्यात आलेली शिक्षा होती. या लढतीत हिंदुस्थानी संघाला पाकिस्तानच्या संघाने 135 धावांचे आव्हान दिले होते.
पाकिस्तानच्या फलंदाज खेळपट्टीवर धाव घेत असताना दोन वेळा धावा घेण्यासाठी प्रतिबंधित असलेल्या क्षेत्रातून धावत होत्या. याबाबत पंचांनी त्यांना ताकीददेखील दिली, पण त्यानंतरदेखील दोन वेळा पाकिस्तानच्या फलंदाजांनी ती चूक केलीच. त्यामुळे पंचांनी दोन वेळा त्यांच्या 5 धावा वजा करून त्या प्रतिस्पर्धी हिंदुस्थानला बहाल केल्या. त्यामुळे हिंदुस्थानच्या खात्यात शून्य चेंडूत 10 धावा जमा झाल्या.
हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाने रविवारी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडला धूळ चारल्यानंतर हिंदुस्थानी महिला संघाने दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानच्या संघावर 7 गडी राखून दणदणीत मात केली. अनुभवी मिताली राजने अर्धशतकी खेळी करून विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
























































