’56 इंच छाती’वाल्यांना 79 दिवसानंतर कळाले मणिपूरवासीयांचे दु:ख

आपली छाती ‘छप्पन इंचाची’ असल्याचे म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत 79 दिवसांनी मौन सोडल्याबद्दल त्यांच्यावर टीका होत आहे. मणिपूरमध्ये हिंसाचाराला 3 मे पासून सुरूवात झाली होती. संपूर्ण मणिपूर हे हिंसेच्या आगीत होरपळत असताना पंतप्रधान अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. त्यांनी या दौऱ्यांच्या ऐवजी आपल्या देशात काय सुरू आहे यावर अधिक लक्ष द्यायला हवं असे राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षाच्या बहुसंख्य नेत्यांनी सुनावले होते.

2 महिने 17 दिवसांनी पंतप्रधान मोदींनी मौन सोडले

मणिपूरमध्ये 3 मे 2023 पासून हिंसाचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदाही यावर भाष्य केले नव्हते. 2 महिने 17 दिवसांनी आज पंतप्रधानांनी मौन सोडले. पंतप्रधान म्हणाले, ‘माझे मन दुःख आणि रागाने भरले आहे. मणिपूरमधील घटना कोणत्याही सभ्य समाजासाठी लज्जास्पद आहे. 140 कोटी देशवासीयांना मान खाली घालायला लावणारी आहे. गुन्हेगारांना सोडले जाणार नाही, कठोर पावले उचलू. सर्व मुख्यमंत्र्यांनी कायदा-सुव्यवस्था मजबूत करावी. महिलांचा सन्मान ठेवला पाहिजे.’

गेल्या अडीच महिन्यांपासून आगडोंब उसळलेल्या मणिपूरमध्ये हिंसाचाराने क्रूरतेचा कळस गाठला असून, माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. 4 मे 2023 रोजी जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढली आणि त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. याबाबतचा थरकाप उडवणारा व्हिडिओ आज व्हायरल झाल्यानंतर मणिपुरातील भाजप सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारला आता जाग आली आहे. या थरकाप उडवणाऱया घटनेने अवघा देश हादरला असून, सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.