मालिका खेळणार पण हिंदुस्थानी खेळाडूंशी हस्तांदोलन नाही! आफ्रिकन खेळाडूंना कोरोनाचा धसका

805

जगभरातील 100 देशांत पसरलेल्या जीवघेण्या कोरोना विषाणूंचा हिंदुस्थान दौऱ्यावर येणाऱ्या दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघानेही मोठा धसका घेतलाय. आम्ही हिंदुस्थानात वन डे मालिका ठरल्याप्रमाणे खेळू पण हिंदुस्थानी खेळाडूंपासून मात्र दोन हात दूर राहू. त्यांच्याशी हस्तांदोलन करणार नाही असा संदेश दक्षिण आफ्रिकन क्रिकेट प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी बीसीसीआयला दिला.

क्रिकेट सामना संपल्यावर दोन्ही संघांतील खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ एकमेकांशी हस्तांदोलन करतात. हे केल्यामुळे खेळभावना चांगल्या पद्धतीने राखली जाते आणि खेळातील वैर विसरण्यास मदतही होते. पण आता तर इंग्लंडच्या संघाने हस्तांदोलन करण्यास नकार दिल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यापाठोपाठ कोरोनाच्या भीतीने दक्षिण आफ्रिकेच्या संघाने हिंदुस्थानी संघाबरोबर हात मिळवण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे.

हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेला 12 मार्चला सुरुवात होणार आहे. हिंदुस्थानात सध्याच्या घडीला कोरोना वायरसचे 53 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आफ्रिकेच्या संघाने हिंदुस्थानात येताना एक मोठे पाऊल उचलले आहे. दोन्ही संघात 12 मार्चला पहिला सामना धरमशाला येथे होणार आहे. त्यानंतर 15 मार्चाला दुसरा सामना लखनौ येथे आणि मालिकेतील अखेरचा सामना 18 मार्चला कोलकाता येथील इडन गार्डन्स येथे होणार आहे.

हिंदुस्थानात कोरोनाचा प्रदुर्भाव झाला आहे. त्यामुळे आम्ही कोरोनापासून लांब राहण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासाठी आम्ही लोकांपासून दोन हात लांब राहण्याचा विचार करत आहोत. खेळाडूंनी हस्तांदोलन टाळणे हा याच गोष्टीचा एक भाग आहे, असे दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघाचा प्रशिक्षक मार्क बाऊचर म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या