हिंदुस्थान-इंग्लंड एकदिवसीय सामन्यावर सट्टा, दुर्बिणीद्वारे निरीक्षण करणारे 33 सट्टेबाज गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गहुंजे येथे सुरू असलेल्या दुसऱया हिंदुस्थान – इंग्लंड एकदिवसीय सामन्यावर दुर्बिणीद्वारे निरीक्षण करून सट्टा लावणाऱया विविध राज्यांतील 33 जणांना तीन ठिकाणांहून पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याजवळून तब्बल 44 लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. 26) ही कारवाई करण्यात आली.

वाकड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी याबाबत माहिती दिली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) गहुंजे येथील मैदानावर हिंदुस्थान – इंग्लंड संघामध्ये शुक्रवारी दुसरा एकदिवसीय सामना होता. या सामन्याचे दुरून दुर्बिणीद्वारे निरीक्षण करून सामन्याची बॉल टू बॉल माहिती देत काही जण ऑनलाईन सट्टा खेळत असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मामुर्डी येथील गोदरेज ग्रीनपार्क या नावाने सुरू असलेल्या ट्रायकॉन इन्फ्रा बिल्डटेक कंपनी, घोरावडेश्वर डोंगर आणि विमाननगर येथील हॉटेल लेमन ट्री या तीन ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात सट्टा लावणाऱया विविध राज्यांतील 33 जणांना जेरबंद करण्यात आले. त्यामध्ये आरोपींकडून 74 मोबाईल, 3 लॅपटॉप, 1 टॅब, 8 कॅमेरे, 4 दुर्बीण, एक स्पीकर आणि चार इंडेव्हर मोटार असा 44 लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.