Cricket News: प्रखर सूर्यप्रकाशामुळे खेळ थांबवला, क्रिकेट इतिहासातील दुर्मिळ घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नॅपियर

अंधूक प्रकाशामुळे क्रिकेटचे सामने थांबवल्याचे किंवा रद्द झाल्याचे ऐकीवात आहे मात्र हिंदुस्थान व न्यूझीलंडमध्ये सुरू असलेला पहिला एक दिवसीय सामन्याचा खेळ प्रखर सुर्य प्रकाशामुळे थांबविण्यात आला आहे. क्रिकेटच्या इतिहासातील ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे. प्रखर सुर्यप्रकाश डोळ्यावर येत असल्याने चेंडू दिसण्यास त्रास होत असल्याची तक्रार फलंदाज शिखर धवनने केल्यानंतर मैदानावरील पंचांनी तीस मिनिटांचा ब्रेक घेतला होता. पंचानीही त्यांना चेंडू दिसण्यास त्रास होत असल्याचं सांगितलं आहे.

साधारणपणे क्रिकेटच्या मैदानांवरील खेळपट्ट्या या उत्तर दक्षिण दिशेने असतात. मात्र मॅकलिन पार्क मैदानावरील खेळपट्टी ही पूर्व पश्चिम दिशेने आहे. त्यामुळे सुर्यप्रकाश थेट डोळ्यावर येत असल्याने बॉल दिसत नसल्याची तक्रार शिखर धवनने केली. शिखर धवनच्या तक्रारीमुळे मैदानावरील पंच देखील अचंबित झाले होते. मात्र नंतर त्यांनी मैदानावरील परिस्थितीचा आढावा घेत खेळ थांबवला.

‘माझ्या चौदा वर्षाच्या करिअरमध्ये मी अशा प्रकारची घटना क्रिकेटच्या मैदानावर कधीही पाहिलेली नाही’, अशी प्रतिक्रीया यावेळी पंच शॉन हैग यांनी दिली. तर कॉमेंटेटर हर्षा भोगले यांनी देखील त्यांच्या कारकिर्दीतील ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले. तसेच यावेळी त्यांनी खेळपट्ट्या या उत्तर दक्षिण दिशेनेच असल्या पाहिजेत असेही सांगितले.