बेपत्ता विमानाची माहिती देणाऱ्यास पाच लाखांचे बक्षीस

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आसामच्या जोरहाट एअरबेसवरून बेपत्ता झालेल्या हवाई दलाच्या ‘एएन-32’ या विमानाचा सहा दिवस उलटले तरी ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे हवाई दलाने या विमानाचा शोध घेण्याकामी नागरिकांना आवाहन करत विमानाची माहिती देणाऱ्यास पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.

हवाई दलाचे ‘एएन-32’ हे विमान अरुणाचल प्रदेशमधील घनदाट जंगलाच्या मेनचुका परिसरातून गायब झाले. या घटनेला सहा दिवस उलटून गेले आहेत. या दिवसांत विविध सुरक्षा यंत्रणांच्या माध्यमातून शोधमोहीम राबवली गेली. हवाई दलाच्या विमान आणि हेलिकॉप्टरबरोबरच नौदलाचे दीर्घ पल्ल्याचा वेध घेणारे विमान तसेच इस्त्र्ााsच्या उपग्रहांद्वारे विमानाचा शोध घेतला जात आहे. मात्र खराब वातावरणामुळे या शोधमोहिमेत वारंवार अडथळे येत आहेत. कमी दृश्यमानतेमुळे हेलिकॉप्टरचा वापर करता येत नाही. सर्व प्रयत्न करूनही सहा दिवसांत काहीच हाती न लागल्यामुळे हवाई दलाने आता नागरिकांनाही शोधमोहिमेत सहभागी करून घेण्याचे ठरवले आहे. याच हेतूने बेपत्ता विमानाची माहिती देणाऱ्या व्यक्ती वा समूहाला पाच लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे हवाई दलाने जाहीर केले आहे. एअर मार्शल आर.डी. माथूर, एओसी इन कमांड, इस्टर्न एअर कमांड यांनी या बक्षिसाची घोषणा केल्याचे संरक्षण दलाचे जनसंपर्क अधिकारी विंग कमांडर रत्नाकर सिंग यांनी सांगितले.

या क्रमांकावर माहिती द्या!
बेपत्ता विमानाच्या ठिकाणाबाबत काहीही माहिती मिळाल्यास
0378-3222164, 9436499477, 9402077267, 9402132477
या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवाई दल प्रमुखांचा जोरहाट दौरा
हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी.एस. धनोआ यांनी शनिवारी जोरहाटचा दौरा केला. या वेळी त्यांना हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी विमानाच्या शोधमोहिमेबाबत विस्तृत माहिती दिली. त्यानंतर त्यांनी बेपत्ता विमानात असलेल्या अधिकारी व प्रवाशांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

आपली प्रतिक्रिया द्या