
सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन
अमेरिकेतील हिंदुस्थानी वंशाच्या प्रसिद्ध वकील निओमी जहांगीर राव यांची डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया सर्किट कोर्ट ऑफ अपीलमध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. अमेरिकेत सर्वोच्च न्यायालयानंतरचे हे महत्त्वपूर्ण न्यायालय आहे. श्रीनिवासन यांच्यानंतर एवढ्या मोठ्या पदावर विराजमान होणाऱ्या राव या दुसऱ्या हिंदुस्थानी- मेरिकन ठरल्या आहेत.
व्हाईट हाऊसच्या रुजवेल्ट रूममध्ये मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाचे क्लेरेन्स थॉमस यांनी निओमी राव यांना न्यायाधीशपदाची शपथ दिली. राव यांनी बायबलवर हात ठेवून शपथ घेतली. त्यावेळी त्यांचे पती अॅलन लेकोविझ हजर होते. गेल्या वर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या पदासाठी राव यांचे नाव सुचवले होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात सिनेटनेही राव यांच्या नावावर 53-46 अशा मतांनी शिक्कामोर्तब केले होते. त्यांनी वादग्रस्त न्यायाधीश ब्रेट कानवाह यांची जागा घेतली आहे.
हिंदुस्थानात पारशी कुटुंबात 22 मार्च 1973 साली जन्मलेल्या निओमी जहांगीर राव यांचे बालपण मिशीगनच्या ब्लूमफिल्ड भागात गेले. डेट्रॉईट येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी येल युनिव्हर्सिटीतून पदवी मिळवली. शिकागो विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. त्या जॉर्ज बुश यांच्या सरकारमध्ये सहायक वकील होत्या. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काम करण्याआधी त्या जीएमयूमध्ये सहाय्यक विधी प्राध्यापक होत्या.






















































