
सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना अग्निवीर अक्षय गवते यांना वीरमरण आले. शहीद झालेले गवते हे देशातील पहिले अग्निवीर असून ते मूळचे बुलढाणा जिह्यातील पिंपळगाव सराईचे राहणारे आहेत. सियाचीनमधील ग्लेशियरवर कर्तव्य बजावताना 20 ऑक्टोबर रोजी त्यांची प्रकृती ढासळली. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र काल रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, सोमवारी त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अक्षय गवते हे 30 डिसेंबर 2022 रोजी अग्निवीर म्हणून सैन्यात दाखल झाले होते. सियाचीनमध्ये ते कर्तव्य बजावत होते. त्यांना लहान बहीण असून आई-वडील शेती करतात. अक्षय यांचे शालेय शिक्षण पिंपळगाव सराई येथील जनता विद्यालयात झाले. 22 ऑक्टोबर रोजी त्यांचे पार्थिक जम्मू-कश्मीरहून दिल्ली येथे आणण्यात आले.
शहीदांचा अपमान करणारी अग्निवीर योजना
अग्निवीर ही योजना शहीदांचा अपमान करण्यासाठी तयार करण्यात आल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. त्यांनी अक्षय गवाते यांचे छायाचित्र एक्सवरून शेअर करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. एक जवान देशासाठी शहीद झाला. या जवानांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाहीत याकडे त्यांनी लक्ष वेधले.

























































