केंद्रात गेल्या 10 वर्षांपासून सत्तेत असलेल्या मोदी सरकारमुळे हिंदुस्थानात प्रचंड बेरोजगारी वाढली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हातात डिग्री असूनही नोकरी मिळवणे अवघड झाले आहे. हिंदुस्थानात नोकरी मिळत नसल्यामुळे अनेक जण परदेशात मिळेल ती नोकरी स्वीकारत आहेत.
सध्या कॅनडामधील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. वेटरची नोकरी मिळवण्यासाठी हिंदुस्थानी नागरिकांनी एका रेस्टॉरेंटबाहेर लांबच लांब रांगा लावल्या आहेत. हा व्हिडीओ कॅनडा येथील ब्रॅम्पटनमधील तंदुरी फ्लेम रेस्टॉरेंटचा आहे.
स्थानिक माध्यम संस्था ओमनी टेलिव्हिजनने काही दिवसांपूर्वी या घटनेचा रिपोर्ट देताना आपल्या यूट्यूब चॅनेलवर व्हिडीओ जारी केला. या रेस्टॉरेंटने नव्या व्हेंचरसाठी वेटर आणि सर्व्हर पदांसाठी भरती सुरू केली आहे. यासंबंधी जाहिरातही प्रसिद्ध केली होती. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावरील अनेक युजर्संनी जोरदार कमेंट केल्या आहेत.
कर्मचारी कपात सुरूच…
देशभरात नव्या पदांची भरती होताना दिसत नाही. परंतु अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपातीच्या नावाखाली हजारो तरुणांना घरी बसवले आहे. देशातील वेगवेगळ्या कंपन्यांनी पैसे वाचवण्यासाठी कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन भरती आणि जागा निर्माण करण्यात केंद्रातील मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे.