मराठमोळय़ा कलाकाराचा श्रीलंकेत झेंडा, अमोल हेंद्रे यांच्या वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 प्रसिद्ध छायाचित्रकार अमोल हेंद्रे यांनी आपल्या कॅमेरात बंदिस्त केलेल्या वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्रीलंकन दूतावासाच्या सहकार्याने कोलंबो येथील गॅलरी ऑफ लाईफ येथे या दोन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

डिस्कव्हरी, ऑनिमल प्लॅनेट अशा वाहिन्यांमुळे लहानपणापासून अमोल यांना वन्यजीवनाविषयी आकर्षण निर्माण झाले. 2006 सालापासून ते वन्यजीव छायाचित्रण करू लागले. रणथंबोर, कान्हा आणि बांधवगढ राष्ट्रीय उद्यानाला भेट दिल्यानंतर 2011 साली त्यांनी पहिल्यांदा आफ्रिकेला भेट देऊन तेथील वन्यजीवन टिपले. आतापर्यंत त्यांनी जॉर्डन, इस्रायल, व्हिएतनाम, इंडोनेशिया, केनिया आणि श्रीलंकेतील जंगलात भटपंती करत वाघ, सिंह, बिबटय़ा, हत्ती, गेंडा, जिराफाची छायाचित्रे आपल्या पॅमेरात बंदिस्त केली आहेत. प्रदर्शनाबद्दल अमोल हेंद्रे सांगतात, प्रिडेटर्स पह्टोग्राफी म्हणजेच जे प्राणी इतर प्राण्यांची शिकार करून त्यावर उदरनिर्वाह करतात ही माझ्या छायाचित्र प्रदर्शनाची थीम होती. या प्रदर्शनात आजवर मी ज्या ठिकाणांना भेटी दिल्या तिथल्या वन्यजीव छायाचित्रांचा समावेश होता. खासकरून महाराष्ट्रातील 40 छायाचित्रांचा प्रदर्शनात समावेश होता. अधिकाधिक परदेशी पर्यटकांनी महाराष्ट्रात वळावे आणि इथले वन्यजीवन अधोरेखित व्हावे यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न होता. श्रीलंकेपूर्वी इंडोनेशियात अमोल यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. पुढील महिन्यात युगांडा येथे पर्यटन महामंडळातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत ते सहभागी होणार आहेत.