सावधान! रेल्वेने प्रवास करताना ‘ही’ चूक महागात पडणार, 3 वर्षांची शिक्षा होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामान्य प्रवाशांसाठी ‘लाईफलाईन’ समजल्या जाणाऱ्या रेल्वेने दररोज कोट्यवधी लोकं प्रवास करतात. दूरच्या आणि सुरक्षित प्रवासासाठी आजही लोक रेल्वेला पसंती देतात. मात्र गेल्या काही काळात रेल्वेला आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. यात खासगी मालमत्ता आणि सरकारी मालमत्तेचेही प्रचंड नुकसान होते. या घटनांमध्ये बऱ्याचदा प्रवाश्यांचीही चूक असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या आगीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वेने प्रवाशांसाठी नियमावली जारी केली आहे.

रेल्वेने ट्वीट करून एक नोटीफिकेकेशन जारी केले आहे. रेल्वेने प्रवास करताना ज्वलनशील पदार्थ घेऊन स्वत: प्रवास करू नका आणि इतरांनाही करू देऊ नका. हा गुन्हा असून कायदेशीर कारवाईसोबत तुरुंगाची हवाही खावी लागू शकते, असे ट्वीट रेल्वेने केले आहे.

रेल्वेने प्रवास करताना केरोसिन (रॉकेल), सुकलेला चारा, स्टोव्ह, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, काडीपेटी, फटाके यासारख्या आग पसरवणाऱ्या ज्वलनशील पदार्थांची ने-आण करणे गुन्हा आहे. हे पदार्थ सोबत घेऊन प्रवास करू नका, असा इशारा रेल्वेने आपल्या ट्वीटद्वारे दिला आहे. यामुळे तुम्ही स्वत:चा आणि इतर प्रवाश्यांचाही जीव धोक्यात घालत असल्याचा इशारा रेल्वेने दिला आहे.

पश्चिम रेल्वेने केलेल्या या ट्वीटनुसार, आग पसरवणाऱ्या या ज्वलनशील पदार्थांना सोबत घेऊन रेल्वेने प्रवास करणे रेल्वे अधिनियम 1989, कलम 164 नुसार गुन्हा आहे. या पदार्थांसोबत पकडले गेल्यास आरोपीला 3 वर्षांपर्यंत शिक्षा किंवा हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तसेच आगीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जर एखादा प्रवासी रेल्वेमध्ये धुम्रपान करताना आढळून आल्यास त्याची तुरुंगात रवानगी करण्यात येईल. तसेच रेल्वे परिसरामध्ये धुम्रपान करण्यासही मनाई असून असे आढळून आल्यास त्या व्यक्तीकडून 200 रुपयांचा दंड वसूल केला जाऊ शकतो.